भाजपाने शिवसेनेशी युती केल्यास रालोआतून बाहेर पडेन
खा.नारायण राणेंचा इशारा
मुंबई : भाजपाच्या काल झालेल्या महामेळाव्यात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणूकीत शिवसेनेशी युती करण्याची तयारी दर्शविली असतानाच भाजपकडून राज्यसभेवर गेलेले खा.नारायण राणे यांनी मात्र या युतीला कडाडून विरोध केला असून, अशी युती झाल्यास रालोआतून बाहेर पडू असा इशारा दिला आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसोबत युती केल्यास मी राष्ट्रीय रालोआ बाहेर पडेन, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि भाजपकडून राज्यसभेवर गेलेले खा. नारायण राणे यांनी दिला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणे बोलत होते.आगामी निवडणुकीत शिवसेनाच आपला क्रमांक एकचा शत्रू असेल असेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत भाजपाने शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतल्यास मी भाजपाची साथ सोडेन असा इशारा दिला. जेव्हा मला राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देत होते तेव्हा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याचा भाजपला इशारा दिला होता.शिवसेना एवढी आडमुठी भूमिका घेत असेल तर त्यांच्याशी युती केल्यास मलाही भाजपासोबत राहणे योग्य वाटत नाही असे राणे यांनी स्पष्ट केले. काल बीकेसीच्या मैदानात झालेल्या भाजपाच्या महामेळाव्यात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची तयारी दर्शविली आहे.मात्र राणे यांनी शिवसेना विरोधीत भूमिका घेतल्याने भाजपाकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते हे महत्वाचे आहे.