हल्लाबोल यात्रेदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले दुष्काळी माणमध्ये श्रमदान
सुनील तटकरे, धनंजय मुंडेंनी गावक-यांसह हाती घेतले टोपले आणि खोरे
दहीवडी ( माण/सातारा ) : हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने दौ-यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज हातात टोपले आणि खोरे घेत श्रमदानात सक्रिय सहभाग घेतला.
पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाच्या सातव्या दिवसाची सुरुवात करताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. विजयसिंह मोहिते पाटील,आमदार शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ , दीपक आबा सोळुंके यांनी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथे दर्शन घेतले , आशीर्वाद घेतले व राज्याला फसव्या सरकारच्या कचाट्यातून सुखरूप बाहेर काढण्याचे साकडे घातले. त्यानंतर दहिवडी कडे सभेकडे जात असताना पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या वावरहिरे ता माण जि. सातारा या गावात श्रमदान सुरू होते. नेत्यांनी स्वतः गाड्या तिथे थांबवल्या आणि सर्वच नेते खोरे, टोपले घेऊन श्रमदानात सहभागी झाले . काही काळ श्रमदान करून गावक-यांच्या या श्रमास यश मिळो गाव कायम दुष्काळ मुक्त होवो अशी सदिच्छा व्यक्त करुन सभेकडे रवाना झाले. नेत्यांच्या सहभागामुळे गावकऱ्यात उत्साह दिसून आला.