रामदास आठवले यांनी राजीनामा द्यावा
संजय निरूपम यांची मागणी
मुंबई : दलित अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असूनही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शांत आहेत. त्यामुळे आठवले यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली आहे.
भाजप शासित राज्यात सत्तेचा गैरवापर करून जातीय सलोख्यात असलेल्या संशयात्मक भूमिकेचा निषेध करण्यासाठी काॅग्रेसकच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकदिवसीय उपवास सुरु आहे. काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण परभणी येथे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर येथे, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नाशिक येथे, बाळासाहेब थोरात नगर येथे, हर्षवर्धन पाटील पुणे, शरद रणपिसे कोल्हापूर, माणिकराव ठाकरे अकोला, विलास मुत्तेमवार नागपूर येथे, विजय वडेट्टीवार चंद्रपूर येथे उपवास करित आहेत.
मुंबईमध्ये मुंबई अध्यक्ष निरूपम यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात येत आहे. त्यावेळी त्यांनी आठवले यांच्या राजीनाम्याची मागणी केली.आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यापासून ते दलित अत्याचाराच्या घटनांवर मौन बाळगून असल्याने दलित समाजाच्या मनात त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आठवलेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा असे निरूपम यांनी म्हणाले.