धनंजय मुंडे रात्री सलाईनवर सकाळी पुन्हा लाईनवर
धनंजय मुंडेंच्या आजारपणातही नेहमीच्या स्टाईल मधील भाषणाने सातारकर खुश
सातारा : रखरखत्या उन्हात सुरू असलेली हल्लाबोल यात्रा नेहमीचे सततचे दौरे, दगदग, रोज तीन ते चार सभा, त्यात पोटतिडकीने केलेली आक्रमक भाषणे , रस्त्यावर उन्हाचे बसणारे चटके आणि गाडीतले थंड वातावरण यामुळे वेगवेगळ्या वातावरणाचा होणारा परिणाम , अवकाळी पावसात चिंब भिजून करावी लागणारी भाषणे, जेवण आणि झोपेच्या अवेळा, सकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंतचा व्यस्त कार्यक्रम यामुळे प्रकृतीवर परिणाम होऊन विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना सातारा जिल्हयातल्या दौ-यात सलाईन लावावे लागले असले तरी , ‘रात्री सलाईनवर सकाळी पुन्हा लाईनवर’ या लाईनप्रमाणे धनंजय मुंडेंच्या आजारपणातही नेहमीच्या स्टाईल मधील भाषणाने सातारा आणि जिल्हयाची जनता खुश झाली.
पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्यात सहाव्या दिवशी कुरुडवाडी ची सभा भर पावसात झाली. त्याचा परिणाम सातव्या दिवशी सातारा जिल्हयातल्या सभेदरम्यान जाणवला. सकाळी दहिवडीच्या सभेतले भाषण संपल्यानंतर धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी सभा सोडून विश्रामगृहावर औषध घेऊन आराम केला. त्यामुळे त्यांना कोरेगावची सभा चुकवावी लागली तरी रात्रीच्या साताराच्या सभेत त्यांनी हजेरी लावून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेला आसूड हाती घेत स्वतःच्या शाब्दिक फटका-यांनी भाजपा सेना सरकारचे वाभाडे काढले आणि साताराची सभा जिंकली.
या सभेनंतर रात्री त्यांना पुन्हा साता-यातील एका खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले. इतके होऊनही त्यांनी सोमवारी सकाळी पुन्हा सलाईनवरून लाइन वर येत हल्लाबोल यात्रेत सहभागी होत आपल्या नेहमीच्या स्टाईलने पाटणची सभा गाजवली.पावसात भिजल्याने थोडीशी सर्दी आणि ऍसिडिटी चा त्रास जाणून लागला होता मात्र आता मी सरकारवर फटकारे लावायला फिट अँड फाइन असल्याचे स्वतः मुंडे यांनी या सांगितले.धनंजय मुंडे यांची लोकप्रियता प्रचंड वाढत असल्याचे त्यांच्या भाषणाला मिळणारा प्रतिसाद पाहता दिसुन येत आहे.