शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराने चालणारा पक्ष असल्याने युती होईल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
मुंबई : शिवसेना हा बाळासाहेबांच्या विचाराने चालणारा पक्ष असल्याने आगामी निवडणूकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सामनाचे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
ज्या ज्या वेळी या देशातील तथाकथित सेक्युलर एकत्र होतील, त्या-त्या वेळी या देशातील खरे सर्वधर्मसमभाव मानणारे हिंदुत्ववादी एकत्र येतात, हा इतिहास आहे.शिवसेना हा बाळासाहेबांच्या विचाराने चालणारा पक्ष असल्याने आगामी निवडणूकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत व्यक्त केला. गेल्या निवडणूकीत शिवसेना आणि भाजपाची युती शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळे तुटली. युती झाली असती तर कदाचित मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे किंवा संजय राऊत विराजमान झाले असते अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्णय तुम्हाला कळतात का असा प्रश्न खा. राऊत यांनी केला असता त्यावर मुख्यमंत्र्यांनी नाही असे उत्तर दिले. मग असे असतानाच तुम्ही युती होणारच असे ठाम पणे कसे सांगू शकता असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना राऊत यांनी केला, शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पक्ष आहे. या देशातले तथाकथित सेक्युलर एकत्र होतील. तेव्हा या देशातील हिंदुत्त्ववाद्यांना एकत्र यावेच लागेल असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. खा. राऊत यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच ही मॅच ( मुलाखत ) फिक्स नाही असे म्हटले. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही हा सामना नाही असे सांगत खा. राऊत यांची फिरकी घेतली. आताही भाजपा आणि शिवसेनेची युती होईल, कारण तुमच्या मनात काय आकडा आहे ते आम्हाला माहित आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तुमच्या सत्तेचा रिमोट कोणाकडे आहे असा प्रश्न खा. राऊत यांनी उपस्थित करताच, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्या हाती रिमोट द्यायला आवडला असता पण आता आमच्या पक्षात कोणीही रिमोट कंट्रोल नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह हे आमच्या निर्णयांमध्ये लक्ष घालत नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.