राज्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व अजितदादाच करणार
सुप्रियाताईंची घोषणा
मुंबई : राज्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व अजितदादात करतील असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. वारजे येथे झालेल्या हल्लाबोल सभेदरम्यान ताईंनी हे स्पष्टीकरण केले आहे. सुप्रियाताईंच्या या घोषणेमुळे राज्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व हे अजित पवारच करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रिया सुळे की अजितदादा राज्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्व करणार यावर गेले काही दिवस चर्चा सुरू होती. आज खुद्द सुप्रियाताईंनीच खुलासा केल्याने राष्ट्रवादीतल्या राज्यातील नेतृत्वाच्या वादावर पडदा पडला आहे.
सुप्रियाताईंनी पुण्यातील वारजे येथे झालेल्या हल्लाबोल सभेत ही घोषणा केल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सभेवेळी अजितदादा यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच नेते उपस्थित होते. राज्यात आघाडीची सत्ता असताना अजितदादा यांच्यानंतर खासदार झालेल्या सुप्रियाताई या राज्यातील राजकारणात सक्रिय होवून त्यांनी राज्यभरातील पक्षाच्या कार्यक्रमांना आणि सभांना उपस्थिती दाखवल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार हे राज्यात सुप्रियाताईकडे नेतृत्व देतील अशी चर्चा होती. सध्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा अंतिम टप्प्यात असून, या सभांदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या भाषणाला तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात दाद देत असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांचा उत्साह वाढला असतानाच आज सुप्रियाताईंनी राज्यात अजितदादाच नेतृत्व करणार असल्याची घोषणा केल्याने कार्यकर्ते आनंदी असल्याचे चित्र आहे.