लवकरच एसटीच्या विना वातानुकूलीत स्लिपर बसेस धावणार

लवकरच एसटीच्या विना वातानुकूलीत स्लिपर बसेस धावणार

मुंबई : विना वातानुकूलीत स्लिपर (नॉन एसी स्लिपर) बसेसची नोंदणी आणि वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाला शासनामार्फत आधीच परवानगी देण्यात आली आहे. तथापि, ही परवानगी फक्त एसटी महामंडळातील गाड्यांना देण्यात आली असून, खासगी वाहनांना राज्यात नोंदणीची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबतीत एसटी महामंडळाचा एकाधिकार असून लोकांच्या सेवेत लवकरच एसटीच्या विना वातानुकूलीत स्लिपर (नॉन एसी स्लिपर) बसेस दाखल होतील, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

राज्यात विना वातानुकूलीत स्लिपर बसेसच्या नोंदणीला संमती नाही. तथापि, एसटी महामंडळाच्या बाबतीत मात्र ही अट दूर करण्यात आली असून शासनाने महामंडळास यासंदर्भातील नियमामध्ये सूट दिली आहे. राज्यात विना वातानुकूलीत स्लिपर बसची नोंदणी करण्यास तसेच या बसेस चालविण्यास राज्य शासनाच्या परिवहन विभागामार्फत महामंडळास परवानगी देण्यात आली आहे.

रावते म्हणाले, महामंडळामार्फत लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात राज्यभर चालविल्या जातात. लोक रात्री प्रवास करण्यास एसटीच्या गाड्यांना प्राधान्य देतात. सध्या असलेल्या बहुतांश गाड्यांमधून बसून प्रवास करावा लागतो. लांबच्या प्रवासासाठी गैरसोय होते. त्यामुळे एसटीमध्ये स्लिपर कोच गाड्या आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काही वातानुकूलीत स्लिपर (एसी स्लिपर) बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखलही झाल्या आहेत. पण सर्वसामान्यांना परवडण्याच्या दृष्टीने आणि त्यांना किफायतशीर दरात प्रवास करता यावा यासाठी विना वातानुकूलीत स्लिपर (नॉन एसी स्लिपर) बसेस महामंडळाच्या ताफ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. महामंडळाने या प्रस्तावास आधीच मान्यता दिली आहे. राज्यात अशा गाड्यांना नोंदणी मिळत नसल्याने तांत्रिक अडचण होती. पण, लोकांची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाच्या परिवहन विभागाने दिनांक १३ एप्रिल २०१६ रोजीच्या पत्रान्वये याबाबतीतील नियमात एसटी महामंडळास सवलत दिली आहे. याबाबतीत आता कुठलीही तांत्रिक अडचण नसून विना वातानुकूलीत स्लिपर बसेसची बांधणीही सुरु आहे. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात आणि लोकांच्या सेवेत विना वातानुकूलीत स्लिपर बसेस लवकरच दाखल होतील, असे त्यांनी सांगितले.

Previous articleबापु इन्हे माफ करना, आजकल सौ चुहे खाकर उपहास किया जा रहा करे
Next articleशेतक-यांचे मंत्रालयाच्या दारात भाजीपाला फेकून आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here