डॉ. बाबासाहेब आंबेडकर “समाजभूषण पुरस्कार” जाहीर
कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारांचीही घोषणा
मुंबई : सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ति व संस्थांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या २०१७-१८ वर्षाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे.
अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती आदी विविध समाजातील लोकांसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्ते व संस्थांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात येतात. सन २०१७-१८ या वर्षाच्या पुरस्कारांसाठी संस्था व व्यक्तिंची निवड समितीने केली आहे.
सन २०१७-१८ या वर्षाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारासाठी भंडारा जिल्ह्यातील मीरा संतोष भट (रा. पुष्पानंद, विनोबा भावे नगर, तुमसर) यांची तर संस्थेचा पुरस्कार बीड जिल्ह्यातील जागर प्रतिष्ठान (पाडळसिंघी, नगररोड, बीड) या संस्थेला जाहीर झाला आहे.सन २०१७-१८ या वर्षाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी विविध जिल्ह्यातील ६१ व्यक्तिंची तर सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या संस्थांची नावे – जनसेवा फाउंडेशन, पुणे, आरोग्य प्रबोधिनी, गडचिरोली, इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, पंढरपूर, कोल्हापुरी लेदर चप्पल उत्पादक व विक्रेता संस्था, कोल्हापूर आणि परिवर्तन विद्याप्रसारक संस्था, धुळे.निवड झालेल्या व्यक्ति व संस्थांना पुरस्काराचे वितरण एका भव्य कार्यक्रमात करण्यात येणार असल्याची माहिती बडोले यांनी दिली.