राज ठाकरे आजच्या सभेत कोणाचा समाचार घेणार !
“नाणार” विषयी भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुलुंडमध्ये जाहीर सभा होत असून, कोकणातील नाणार प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्द्यावर ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असल्याने राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काल शनिवारी नाणार येथिल ग्रामस्थांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती.यावेळी त्यांनी नाणार ग्रामस्थांच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन दिले होते.यासंदर्भात आपली भूमिका मुलुंडच्या सभेत जाहीर करू असे राज ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले होते.मनसेच्या वतीने आज महिलांना शंभर रिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे. केला आहे. त्यानिमित्ताने राज ठाकरे यांची सभा होणार आहे. मुलुंड येथिल भाजी मार्केट परिसरात संध्याकाळी ६ वाजता ही सभा होणार आहे.
शिवाजी पार्कच्या मैदानात झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्याला मनसैनिकांनी लावलेली हजेरी आणि गाजलेली सभा तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात सुरू केलेली व्यंगचित्राची मालिका यामुळे गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले आहे.
पाडवा मेळाव्यात त्यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका करीत मोदी मुक्त भारताची हाक दिली होती. भाजपच्या बीकेच्या मैदानात झालेल्या महामेळाव्यात भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे भाजपवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.
नाणार प्रकरणी सरकारने प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे आजच्या सभेत ते या प्रकल्पासंदर्भात काय भूमिका मांडणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोनच दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करीत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर भाजीपाला फेकला होता. त्याच्यावरही राज ठाकरे आजच्या सभेत भाष्य करण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हे १ मे महाराष्ट्र दिनापासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.हा दौरा पालघर पासून सुरु होणार असून याबाबतची सविस्तर घोषणा आजच्या सभेत होवू शकते.