नाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही
राज ठाकरे यांचा सरकारला इशारा
मुंबई : नाणारमध्ये होवू घातलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला आहे. केवळ पैसा कमवण्यासाठी नाणार परिसरात भाजपा नेत्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्याचा घणाघाती आरोप त्यांनी मुलुंड येथे झालेल्या सभेत केला.
नाणार प्रकल्पाला स्थानिकांनी प्रथमापासूनच विरोध केला आहे.हा प्रकल्प झाल्यास कोकणाचे मोठे नुकसान होईल असे सांगतानाच फक्त पैसे कमविण्यासाठीच या ठिकाणच्या जमिनी खरेदी करणाऱ्या लोकांना हा प्रकल्प हवा आहे. याकरीता नाणारमध्ये भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. त्यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला.या प्रकल्पाला विरोध केल्यास हा प्रकल्प गुजरातला जाईल असे मुख्यमंत्री म्हणतात त्यामुळे याचा निर्णय वरच्या पातळीवर झाला आहे असे सांगतानाच देशात गुजरात शिवाय इतर राज्ये नाहीत का असा सवाल ही राज ठाकरे यांनी केला.
मराठवाड्यात कित्येक फूट खोदूनही पाणी मिळत नाही. राज्यातील जमिनीचे वेगाने वाळवंट होत चालले आहे. राजस्थान या राज्यानंतर सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या जमिनीचे वाळवंटीकरण होत असल्याने जमिनीत पाणी नाही आणि मुख्यमंत्री फडणवीस हे एक लाख विहिरी खोदल्याची माहिती आपल्या भाषणात देत आहे असे सांगत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली. महाराष्ट्रातून भाजीपाला विकण्यासाठी मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधात शिवसेनेचा नगरसेवक तक्रार करतो असे सांगत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचाही समाचार घेतला.