शिवसेनेचे “वर्षावरील अटक” आंदोलन स्थगित !
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथे संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांच्या झालेल्या हत्येच्या आणि शिवसैनिकांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेकडून करण्यात येणारे अटक आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, खा. सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा, तालुका पदाधिका-यांनी नुकतीच शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. या बैठकीत मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देवून नगर मधिल शिवसैनिक अटक करवून घेतील असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीत येथिल शिवसैनिकावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली होती. प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीला युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते.
या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेने केलेल्या मागण्या मान्य झाल्याने नियोजित आंदोलन स्थगित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. उद्या मंगळवारी केडगाव घटनेच्या निषेधार्थ नगर मधिल सेना पदाधिकारी , शिवसैनिक चेंबूर येथिल छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून वर्षावर धडक देणार होते.