विश्वास पाटलांची चौकशी सुरूच ठेवा
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरील आरोपाची झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कपुर यांच्या मार्फत सुरु असलेली चौकशी न थांबवता ती सुरूच ठेवण्यात यावी. चौकशी पूर्ण झाल्यावर दिपक कपुर यांनी आपला अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजीव कुमार यांना दिले आहेत.
त्याच प्रमाणे विश्वास पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये केलेल्या घोटाळ्या प्रश्नी विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण व अन्य काही सदस्य यांनी विधानमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विधीमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार सीआयडी मार्फत याची स्वतंत्र चौकशी करून ती पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात यावा, असे निर्देशही वायकर यांनी गृहनिर्माण सचिवांना दिले आहेत. या चौकशी अहवालात विश्वास पाटील दोषी सापडल्यास त्यांच्यावर उचित ती कारवाई करण्यात येईल, असेही वायकर यांनी सांगितले.