महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
६० लाख ४१ हजार १३८ शौचालय बांधली आता वापरासाठी जागृती करणार
मुंबई : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येवून सर्व प्रशासकीय यंत्रणेने मिशन मोडवर राज्यात शौचालय बांधण्याचे काम हाती घेऊन राज्यात ६० लाखापेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम केले असल्याने महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचा दावा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात २०१२ च्या बेसलाईन सर्वेनुसार केवळ ४५ टक्के कुटुंबाकडे शौचालय होती. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ५५ टक्के कुटुंबांसाठी शौचालय बांधण्याचे आवाहनात्मक काम होते. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे. त्याचबरोबर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने नव नवीन कल्पना राबवून मिशन मोडवर काम करुन आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश प्रगती करीत असताना ५० टक्के भारतीयांकडे शौचालय सुविधा नसणे ही गंभीर बाब असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान घोषित करुन २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे जाहीर केले. या अंतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवून २०१८ मध्येच महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात एकुण ६० लाख ४१ हजार १३९ शौचालय बांधण्याचे काम करण्यात आले आहे. यासाठी ४ हजार कोटी पेक्षा अधिक खर्च केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यात उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करुन तेथील प्रशासकीय यंत्रणेने शौचालय बांधण्याचे काम केले आहे. पहिल्या टप्प्यात शौचालय बांधून प्रत्येकाला शौचालयाचा एक्सेस मिळवून देण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकाने शौचालयाचा वापर करावा याबाबत जागृती करावी लागेल. शौचालय नसल्यामुळे स्त्रियांची होणारी कुचंबना आता थांबेल. त्याचबरोबर आरोग्यदायी वातावरण राहील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मागील चार वर्षात बांधण्यात आलेल्या शौचालयाची माहिती त्यांनी दिली. यामध्ये सन २०१३-१४ मध्ये २ लाख २१ हजार ८४९, सन २०१४-१५ मध्ये ४ लाख ८८ हजार ४०२, सन २०१५-१६ मध्ये ८ लाख ८२ हजार ५३, सन २०१६-१७ मध्ये १९ लाख १६ हजार ४६१ तर सन २०१७-१८ मध्ये २२ लाख ५१ हजार ८१ तर सार्वजनिक व सामुहिक शौचालय २ लाख ८१ हजार २९२ अशी मिळून वैयक्तिक व सार्वजनिक ६० लाख ४१ हजार १३८ शौचालय बांधण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले ३५१ तालुके, २७ हजार ६६७ ग्रामपंचायती, ४० हजार ५०० गावे हागणदारीमुक्त होऊन महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाल्याचे त्यांनी घोषित केले.