बीड जिल्ह्यातील साडे चार हजार कोटीच्या राष्ट्रीय महामार्गाचे उद्या भूमीपूजन

बीड जिल्ह्यातील साडे चार हजार कोटीच्या राष्ट्रीय महामार्गाचे उद्या भूमीपूजन

लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून विकास सोहळ्याचे साक्षीदार व्हा – ना. पंकजाताई मुंडे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसह मुख्यमंत्री अंबाजोगाईत; अंबा कारखाना परिसरात होणार कार्यक्रम

अंबाजोगाई :  बीड जिल्ह्यातील विविध भागातून जाणा-या साडे चार हजार कोटी खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमीपूजन गुरुवारी दु.२ वा. होणार आहे. या भूमीपूजन कार्यक्रमास केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक, जहाजबांधणी, गंगा व जलसंधारण मंत्री नितीन गडकरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या भूमीपूजन कार्यक्रमास बीड जिल्हयातील जनतेने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून विकास सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यातील विविध राज्य रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत झाल्याने या रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या दौरा त्यांनी आखला असून गुरुवारी परभणी-नांदेड-बीड या जिल्ह्यात भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यात बीड जिल्हयातील ७२९ कि.मी.लांबीच्या व ६०४२ कोटी रु.च्या मंजूर कामापैकी ४५८७ कोटी ५४ लाख रु.च्या राष्ट्रीय महामार्ग व रस्ते महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण बीड जिल्ह्यातून होणार आहे. सर्व भूमीपूजनाच्या कार्यक्रमानंतर सभेचा मुख्य सोहळा अंबाजोगाई शहरानजीक असलेल्या अंबासाखर परिसरात दु.२ वा. होणार आहे. या कार्यक्रमास जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाशी शोभा वाढवावी असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

हेलीपॅडसह पाच ठिकाणी वाहनतळ

अंबाजोगाई-परळी शहरातून येणार्‍या वाहनासाठी जयभारत सिटी या ठिकाणी, लातूर-रेणापूर येथून येणार्‍या वाहनांना वाघाळवाडी परिसर, केज-कळंबहून येणार्‍यांसाठी जलशुद्धीकरण केंद्र, राडी-धानोरासाठी अंबा कारखाना परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कारखाना परिसरातच येणार्‍या प्रमुख पाहुण्यांच्या हेलीपॅडची व्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे.

वॉटरप्रुफ मंडप

हवामान खात्याने वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे भूमीपूजन कार्यक्रमात व्यत्यय येवू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्यावतीने अंबा कारखाना परिसरात ३०० बाय १८० फूट लांबीरुदींचा वॉटरप्रुफ सभा मंडप उभारण्यात आला असून या मंडपात सहा भाग बनविले असून त्यात दोन महिलांसाठी, दोन पुरुषांसाठी तर दोन व्यासपीठाच्या डाव्या उजव्या उजव्या बाजूला मिळून व्हीआयपी, व्हीव्हीआयपी व पत्रकारांसाठी बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त

केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपूजन कार्यक्रमास बीड जिल्ह्यासह इतर जिल्हयातील पोलीसांचा फौजफाटा अंबा कारखाना परिसरात उपस्थित झाला असून जागोजागी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. या सर्व कार्यक्रमावर पोलीस आयुक्त, अधिक्षकांची करडी राहणार आहे.

या मान्यवरांची राहणार उपस्थिती

राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपूजन कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्राम विकासमंत्री पंकजाताई मुंडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे, जि.प.अध्यक्षा सविताताई गोल्हार, आ.भिमराव धोंडे, आ.आर.टी.देशमुख, आ.लक्ष्मण पवार, आ.प्रा.संगीता ठोंबरे आदींची उपस्थिती असणार आहे.

Previous articleराज्यातील चार विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास तत्वतः मान्यता
Next articleचार सनदी आधिका-यांच्या बदल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here