शहरी लोकांना हेवा वाटावा असा विकास सरकारने ग्रामीण भागात केला
नितीन गडकरी
गोपीनाथराव मुंडे हे वंचितांचे कैवारी – मुख्यमंत्री
बीड जिल्हा विकासाच्या महामार्गावर आणला – ना पंकजाताई मुंडे
साडे चार हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे थाटात भूमीपूजन
अंबाजोगाई : रस्ते, वीज, पाणी व सिंचन या योजनांची परिपूर्ती होत असल्याने गाव समृद्ध व संपन्न होत आहे. महानगरातील लोकांना ग्रामीण भागाच्या विकासाचा हेवा वाटावा अशा पद्धतीचा विकास केंद्र व राज्य शासन यांनी करून दाखविला. भविष्यात महाराष्ट्र बदलेला दिसेल. यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटीबद्ध आहे. असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथे भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधीकरण व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने बीड जिल्ह्यात होत असलेल्या ६ हजार ४२ कोटी रुपये खर्च करून होणा-या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा. डॉ. प्रितमताई मुंडे, लातूरचे खा. सुनिल गायकवाड, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ. प्रा. संगिता ठोंबरे, आ. सुधाकर भालेराव, बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार,माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ. केशवराव आंधळे, गणेशराव हाके, अंबासाखरचे अध्यक्ष रमेशराव आडसकर, फुलचंद कराड, गयाबाई कराड, बीड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष रमेश पोकळे, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार उपस्थित होते.
यावेळी बोलतांना नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी केंद्र शासनाने बीड जिल्ह्यासाठी दिला आहे. १० हजार कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत. ६ हजार कोटींची कामे सुरू झाली तर उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात येईल व ती कामे चार महिन्यात सुरू करून बीड जिल्ह्याचा चेहरा बदलून टाकला जाईल. केंद्र शासनाच्या मदतीने महाराष्ट्रात अनेक दर्जेदार उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अर्धवट राहिलेली धरणे पूर्ण करण्यासाठी ८४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल तर नाबार्डचे कर्ज १७३९.५० कोटी दिले जाईल. ग्रामीण भागात सर्वांगिण विकास साध्य करून गावे समृद्ध व संपन्न करण्याचा ध्यास केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती निर्माण करण्यासाठी इथेनॉलला प्राधान्य दिले जाणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या ऐवजी इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात होईल. इथेनॉलवर चालणारी वाहने निर्माण झाली आहेत व भविष्यात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. साखर कारखान्याची इथेनॉल पंप चालतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. तर इथेनॉलच्या माध्यमातून बायोप्लास्टिकची निर्मिती करून प्लास्टिक उत्पादन वाढविले जाईल. पेट्रोलियम प्लास्टिक नष्ट होत नसल्याने ते पर्यावरणाला घातक ठरते. मात्र, बायोप्लास्टिक तीन दिवसात जमीनदोस्त होते. ही संकल्पना समोर ठेवून इथेनॉलपासून बायोप्लास्टिकचा प्रकल्प महाराष्ट्र शासन हाती घेणार आहे. महाराष्ट्रात ३० नदीजोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून याचा मोठा फायदा सिंचनासाठी होणार आहे. केवळ मराठवाडयात गोदावरीचे वाहणारे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व धरणांमध्ये सोडले जाईल. अशी व्यवस्था होईल. तीन वर्षात ५० हजार कोटींचा हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जाईल. असे गडकरी यांनी सांगितले.
आगामी काळात रस्त्यांच्या मोठ्या जाळयामुळे शेतीमालाला किंमत मिळणार आहे. गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने महानगरातले लोक पुन्हा गावाकडे येतील. गावांमध्ये व शहरांमध्ये राहणाºया बेघर व्यक्तीला घर उपलब्ध करून देण्यासाठी एक मॉडेल योजना आखण्यात आली आहे. २ लाख ६० हजार रुपयांमध्ये ४५० चौ. मी. चे घर तेही परिपूर्ण सोयींनी उपलब्ध करून दिले जाणार आहे. देशात बेघर कोणी राहणार नाही. यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. तसेच भीमा नावाच्या बांबूची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. या बांबूपासून शर्ट, जरसी, लोणचे, इथेनॉल, पेपर याची निर्मिती होते. कारखाना ऊसाच्या दराने बांबू विकत घेतील व शेतकºयांना आर्थिक क्रांतीचा नवा मार्ग मिळेल. शेतकरी व गावे संपन्न व समृद्ध करून जगातील आदर्श राज्य म्हणून महाराष्ट्राची नवी ओळख पुढे येईल. असे काम शासनाच्या वतीने सुरू आहे.
साडेतीन वर्षात १५ हजार कि.मी. रस्ते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रातील भाजप सरकारने साडेतीन वर्षात १५ हजार कि.मी. चे रस्ते महाराष्ट्रात केले. तर गेल्या ६७ वर्षात केवळ ५ हजार कि. मी. चे काम झाले होते. विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. याची प्रचिती विकासकामाच्या माध्यमातून जनतेच्या समोर ठेवण्यात आली. आगामी काळातही अनेक क्रांतीकारी योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला विकासाच्या शिखराकडे नेण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
या प्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण राज्यात सर्वात जास्त निधी बीड जिल्ह्याला मिळाला. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा वाटा रस्त्यांचा असतो. रस्त्यांमुळे उद्योग व रोजगार उपलब्ध होतो. अर्थक्रांती निर्माण करणारे रस्त्यांचे जाळे, राज्यात तयार होत आहे. तर महाराष्ट्र शासनानेही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तीन वर्षात ३० हजार रस्त्यांची निर्मिती केली. यातील सर्वात जास्त रस्ते बीड जिल्ह्यात झाले आहेत. शौचालयाची संख्या शंभर टक्के करण्यात राज्य यशस्वी झाले आहे. राज्यातील १२ लाख बेघरांना घर देण्यासाठी १० लाख लोकांची सर्व्हेद्वारे नोंदणी झाली आहे. तर उर्वरित २ लाख लोकांची नोंदणी सुरू आहे. येत्या तीन महिन्यात घराचा पहिला हप्ता दिला जाणार आहे व हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठी कर्जमाफी योजना आमच्या सरकारने राबविली. पूर्वी मराठवाडयातील आठ जिल्ह्यात १४०० कोटी रुपये माफ झाले होते. आता एकट्या बीड जिल्ह्याचे ७०० कोटी माफ झाले व आणखी ४०० कोटी बीड जिल्ह्यातील शेतकºयांना मिळतील. अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. जलयुक्त शिवारचे काम बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्याने जलस्वयंपूर्ती व टँकरमुक्तीसाठी बीड जिल्हा अग्रेसर राहिला. शेवटच्या माणसाचा सर्वांगिण विकास हेच ध्येय ठेवून आमची वाटचाल सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंडेंच्या आठवणींनी गडकरी गहिवरले
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी राज्याच्या विकासाला दिशा दिली. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असतांना त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले. आज ते नाहीत. हे दु:ख मनाला हेलावून टाकते. सहकारातही मी मुंडेंच्या प्रेरणेतूनच आज तीन साखर कारखान्यांची निर्मिती केली. ते असतांना बीड जिल्ह्यात येण्याची संधी अनेकदा मिळाली. मात्र, त्यांच्या स्मृति आम्हाला कायम शक्ती देत राहतील. मुंडे यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या कन्या पंकजा व प्रितम या चांगल्या कामाच्या माध्यमातून जोपासत आहेत. मुंडे यांच्या अधुºया स्वप्नांची पूर्तता विकासाच्या माध्यमातून त्या दोघीही करतील. अशा सद्गदीत भावना गडकरी यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभी व्यक्त केल्या.
गोपीनाथ मुंडे हे वंचितांचे कैवारी होते – मुख्यमंत्री
विधानसभेत मुंडेंचा हात धरून राजकारण शिकलो. ते मुंडे ख-या अर्थाने दीनदलित, वंचितांचे कैवारी होते. उपेक्षितांना न्याय देण्यासाठी गोपीनाथराव कधीही मागे हटले नाहीत. रस्त्यावर उतरून गोरगरीबांसाठी, ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांच्या अनेक आठवणींना आपल्या भाषणात उजाळा दिला.
बीड जिल्हा विकासाच्या मार्गावर आणला – ना पंकजाताई मुंडे
लोकनेते मुंडे साहेबांचा जिल्हा असल्यामुळेच बीडला भरभरून निधी मिळाला आहे. हा जिल्हा विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी भविष्यात विविध योजना राबवून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साध्य केला जाईल अशी ग्वाही बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिली.
यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, नितीन गडकरी यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी ८ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. केवळ साध्या एका पत्रावर गडकरी यांनी हा निधी उपलब्ध करून दिला. आगामी काळातही त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठी कामे होतील. त्यांनी दिलेल्या या निधीबद्दल पंकजाताई मुंडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची वारसदार व तुमच्या प्रेमामुळे आज राजकारणात आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काम करीत राहणार आहे. राजकारणात काम करतांना अनेक संकटे आली पण त्यावर मात करीत काम करीत राहिले. आज बीड जिल्ह्याच्या विकासाला एक वेगळी दिशा मिळाली आहे. जिल्हयातील विरोधकांनी आतापर्यंत मुंडे साहेबांना पराभूत करण्यासाठीच खूप राजकारण केलं. जनतेच्या प्रश्नांकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. भाजपचं सरकार आल्यानंतरच आम्ही राजकारणा ऐवजी विकासाची भूक भागवली. यापूर्वी जिल्हयात फक्त दोन राष्ट्रीय महामार्ग होते, आता चौदा महामार्ग झाले आहेत. हा जिल्हा खड्डयातून विकासाच्या महामार्गावर आला आहे. माझ्या जनतेसाठी बेरजेचे राजकारण करीत विकास हाच जनतेचा हक्क या उद्देशाने मी काम करीत राहणार असल्याचे सांगून सत्ता हे साधन लोकांच्या विकासासाठी वापरणार, ऊसतोड मजुरांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तके कसे येईल. ही मुंडे साहेबांची स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी आपण काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या खात्याच्या माध्यमातून झालेल्या विविध योजनांची व कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विकास प्रक्रिया गतिमान झाली – खा. डॉ. प्रितमताई मुंडे
२० वर्षापूर्वी जेव्हा जेव्हा भाजप-सेनेचे सरकार सत्तेत आले होते. त्याच वेळी विकास कामे झाली. गेल्या २० वर्षात विकासप्रक्रिया खंडित झाली होती. ती गतिमान करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने न भूतो न् भविष्यती असा निधी देऊन कामकाज केले. रस्त्यांच्या कामाबरोबरच बीड जिल्ह्यात रेल्वेच्या कामांना गती मिळाली आहे. माझ्या कार्यकाळात रेल्वे लवकरात लवकर कशी धावेल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. अशी ग्वाही खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी दिली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार यांनी केले. संचलन रमेश पोकळे यांनी तर उपस्थितांचे आभार आ. संगिता ठोंबरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महिला व नागरिक भर उन्हातही मोठ्या संख्येने उपस्थित होते.