उध्दव ठाकरे यांचा विरोध अनाठायी

उध्दव ठाकरे यांचा विरोध अनाठायी

आशिष देशमुख

नागपूर : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दर्शविलेला विरोध अनाठायी आणि त्यांचा विदर्भाप्रति असलेला आकस व्यक्त करणारा आहे, असे मत भाजपचे काटोलचे आमदार  आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

विदर्भाच्या हिताचे निर्णय मुंबईत बसून घेता येऊ शकतात. त्यामुळे मुंबईतच पावसाळी अधिवेशन व्हावे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या मतामागे कोणती तर्कबुद्धी कारणीभूत आहे, हे कळायला मार्ग नाही, असे स्पष्ट करून देशमुख यांनी म्हटले आहे, की नागपूर करारान्वये विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर दरवर्षी सहा आठवड्यांचे अधिवेशन नागपुरात व्हावे, असे ठरले होते. मात्र, गेल्या साठ वर्षांपासून तसे कधीही घडले नाही. जेमतेम दोन आठवडे कसेबसे नागपूरचे हिवाळी अधिवेशन पार पाडण्याचा सोपस्कार पूर्ण केला जातो. त्यात विदर्भाला पुरेसा न्याय मिळत नाही. अशा स्थितीत नागपुरात किमान महिनाभराचे पावसाळी अधिवेशन झाल्यास विदर्भाचे प्रश्‍न वेळ देऊन समजून घेणे व त्यावर तोडगा काढून प्रश्‍न मार्गी लावणे सोपे होईल. विदर्भातील बव्हंशी जिल्हे मागासलेले आहेत. त्यांना विकासाच्या दिशेने नेण्यासाठी या पावसाळी अधिवेशनाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा असताना उद्धव ठाकरे यांनी त्याला विरोध करून त्यांचा विदर्भविरोधी कावीळच दाखवून दिली आहे.

विदर्भाला न्याय मिळणार नसेल तर फक्त दोन आठवड्यांच्या हिवाळी अधिवेशनाचा फार्स बंद करावा, अशी मागणी 2017 च्या हिवाळी अधिवेशनादरम्यान जाहीरपणे केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या पावसाळी अधिवेशनाचे सूतोवाच केले होते. आता त्या मागणीला मूर्त स्वरूप येत असताना सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे सर्वसर्वा उद्धव ठाकरे त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा केवळ विदर्भविरोधी कावा असून, तो सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षाला साजेसा नाही, असे आपले स्पष्ट मत असल्याचे देशमुख म्हणाले.

विदर्भाच्या हिताचे निर्णय मुंबईत बसून घेता येतात, असा उद्धव ठाकरेंचा दावा असला तरी तो वस्तुस्थितीच्या विरोधात आहे. आजवर मुंबईतच निर्णय होत आले. ते निर्णय विदर्भाच्या हिताचे असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी इत्यादी प्रश्‍नांनी विदर्भवासीयांना ग्रासले नसते. मुंबईचे निर्णय विदर्भाच्या हिताचे असते तर 1400 किमी दूर असलेल्या गोंदिया-गडचिरोलीतही आतापर्यंत विकास पोचला असता. तसे घडले नाही. हीच वस्तुस्थिती मी सातत्याने मांडत आलो आहे, असे स्पष्ट करून डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे की, नागपूर व विदर्भाचे असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या या दबावतंत्राला बळी पडू नये. त्यांनी प्रस्तावित केलेले पावसाळी अधिवेशन तर नागपुरात घ्यावेच, शिवाय वर्षानुवर्षे चालू असलेले हिवाळी अधिवेशन सुद्धा नागपुरात सुरू ठेवावे.विदर्भाचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे निर्णय मुंबईत बसून करण्याची उद्धव ठाकरे यांना हौस आहे. त्यांची हौसच पुरवायची असेल तर विदर्भाचे राज्य वेगळे करून उर्वरित महाराष्ट्राचे निर्णय उद्धवजींना मुंबईत बसून करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

Previous articleमुंडे बहिण भाऊ आज पुन्हा एकत्रित !
Next articleतपास यंत्रणांवरील सरकारी दबावामुळेच असीमानंद, कोडनानींची सुटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here