कशेडी घाटातील बोगद्याचे काम दोन वर्षात पूर्ण करणार

कशेडी घाटातील बोगद्याचे काम दोन वर्षात पूर्ण करणार

मुंबई :  रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून कोकणात जाणा-या प्रवाशांचाचा प्रवास अपघात विरहित करण्यासाठी महत्वाची भूमिक बजाविणार्‍या कशेडी घाट बोगद्याच्या कामाचा शुभारंभ मे महिन्यात करण्यात येणार असून, २०२० पर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली.

कशेडी घाट बोगद्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीला रत्नागिरीची जिल्हाधिकारी प्रदीप पी., राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड, प्रांताधिकारी अमित शेडगे, खेडचे प्रांत सोनावणे तसेच कशेडी घाटचे काम करणारे कंत्राटदारही यावेळी उपस्थित होते.

एप्रिल ते जुन, मे तसेच दिवाळीच्या सुट्टीत मुंबई, ठाण्यातील प्रवासी मोठ्याप्रमाणात रस्ते मार्गाचा वापर करुन कोकणात जातात. मात्र बर्‍याचवेळा कशेडी घाटात प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागते. या अपघातांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. त्यातच कशेडी घाटाचे ३४ कि.मीचे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. हा वेळ कमी करण्यासाठी तसेच रस्ते वाहतुकीचा वापर करुन कोकणात जाणार्‍या प्रवाशांचा प्रवास अपघात विरहित करण्यासाठी कशेडी घाटातील बोगदा महत्वाची भूमिका बजाविणार आहे. या बोगद्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी संबंधित अधिकार्‍यांसमवेत अनेक बैठका घेतल्या. केंद्र सरकारबरोबर पत्रव्यवहारही केला. त्यानुसार केंद्र सरकारच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने टेंडरच्या माध्यमातून या कामासाठी रुपये ५०२. २५ कोटीं मंजुर केले आहे.

मे महिन्यापासून या बोगद्याचे पाथमुख उघडण्याचे काम सुरू होणार आहे. भोगांव पासून या कामास सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती वायकर यांनी यावेळी दिली. कशेडी येथे पावणे दोन किलोमीटरचे दोन बोगदे तयार करण्यात येणार असून जाण्यासाठी व येण्यासाठी प्रत्येकी ३ लेन ठेवण्यात येणार आहे. तसेच बोगद्यामध्ये लाईटची तसेच वेंटीलेशन व्यवस्था, बोगद्यात गाडीत बिघाड झाल्यास गाडी बाजुला उभी करण्यासाठी विशेष व्यवस्था, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तसेच साईन बोर्डही लावण्यात येणार असल्याची माहिती वायकर यांनी यावेळी दिली.  बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावरही त्या रस्त्याच्या डागडुजीचे काम ४ वर्षे कंत्राटदारालाच करावे लागणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी यावेळी दिली. २०२० पर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर सध्या हा घाट पार करण्यासाठी लागणार्‍या ३० मिनिटांच्या कालावधीत घट होणार असून, बोगदा अवघ्या १० मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार असल्याची माहिती कंत्राटदारांनी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री यांना दिली.

Previous articleराष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा अर्ज दाखल
Next articleमहाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला केंद्राचा पुरस्कार जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here