उध्दव ठाकरेंची सभा होणार ! नाणार संदर्भात महत्वाची घोषणा करणार
खा.विनायक राऊत यांची माहिती
रत्नागिरी : नाणार प्रकल्प समर्थकांच्या माध्यमातून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उद्या होणा-या सभेवर बहिष्कार टाकण्याची अफवा पसरवली जात असून, या सभेला घरातील प्रत्येक व्यक्ती उपस्थित राहणार आहे. त्यामुळे सभेवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट करतानाच उद्याच्या सभेत रिफायनरीसंदर्भात उध्दव ठाकरे हे महत्वाची घोषणा करतील असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज रत्नागिरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. उद्या सोमवारी सागवे – कात्रादेवी येथे सकाळी ११ वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत रिफायनरीसंदर्भात उध्दव ठाकरे हे महत्वाची घोषणा करतील असे खा. राऊत यांनी स्पष्ट केले.नाणार प्रकल्प हा केंद्र सरकारचे पाप असून, या पापात राज्याचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत अशी टिकाही खा. राऊत यांनी केली. या रिफायनरीला स्थानिकांनी विरोध केला आहे. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणीही स्थानिकांनी उध्दव ठाकरे यांना भेटून केली होती. आपण प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार उद्या सोमवारी सागवे – कात्रादेवी येथे सकाळी ११ वाजता उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे.
नाणार प्रकल्पाची राज्यालाच काय पण देशालाही गरज नाही. या प्रकल्पाला शिवसेनेचाही पहिल्यापासून विरोध केला आहे. शिवसेना स्थानिकांसोबत असल्याचे खा.राऊत यांनी सांगितले. एन्राॅन अणुऊर्जा या प्रकल्पांपेक्षाही हा प्रकल्प मोठा प्रदूषणकारी आहे. या प्रकल्पाची राज्याला आणि देशालाही गरज नाही. असेही त्यांनी सांगितले. हा प्रकल्प केवळ शिवसेनाच रद्द करू शकते हा विश्वास स्थानिकांमध्ये आहे. या आंदोलनात फूट पाडायची असल्यानेच प्रकल्पाचे समर्थक कामाला लागले आहेत, असा आरोपही खा. राऊत यांनी यावेळी केला.
प्रकल्प समर्थकांच्या माध्यमातून सभेवर बहिष्कार टाकण्याची अफवा पसरवली जात असून, उध्दव ठाकरे यांच्या सभेवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे वृत्त खोटे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री हे दिल्लीतील नेत्यांचे लाचार झाल्याने त्यांनी येथिल जनतेला दिलेल्या वचनांचा त्यांना विसर पडला असल्याची टिका खा.राऊत यांनी केली.