एका तासात शरद पवारांनी जमा केला पाच कोटींचा निधी
माण : सातारा जिल्ह्यातील माण-खटाव हे तालुके कायम दुष्काळाच्या छायेत आहेत. दुष्काळग्रस्त ही गावाची ओळख पुसण्याचा प्रयत्न येथिल नागरीक श्रमदानातून करीत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माणदेशी जनतेला मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी केवळ एका तासांत दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच कोटींचा निधी मिळवून दिला.
राषाट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज माण दौ-यावर होते.त्यांनी आपल्या या दौ-यादरम्यान वेळेत वेळ काढून वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने माण तालुक्यात नरवणे, वाघमोडेवाडी व खटाव तालुक्यातील मांडले आदी गावांना भेटी दिल्या.पवार यांनी केवळ भेट दिली नाही तर येथिल जलसंधारणाच्या कामासाठी शरद पवार यांनी केवळ एका तासांमध्ये दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच कोटींचा निधी मिळवून दिला. जलसंधारणाच्या कामांसाठी
सरकारवर अवलंबून न राहता मदत करण्याची ग्वाही पवार यांनी यावेळी माणच्या जनतेला दिली.
माण खटाव तालुका हा दुष्काळाच्या छायेत आहे. या गावांची ही ओळख पुसण्याचा प्रयत्न येथिल जनता श्रमदानातून करीत आहे असे पवार यांनी सांगितले. गेल्या वर्षी पवार यांनी दोन्ही तालुक्यातील गावांना खासदार फंडातुन एक कोटींचा निधी दिला होता. आज पवार यांनी सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना फोन करुन बॅंकेकडून या कामासाठी मदत करण्यास सांगितले असता आ.भोसले यांनी लगेच एक कोटींची मदत जाहीर केली. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही दीड कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले. यानंतर पवार पुढील दौ-यासाठी गाडीत बसले आणि त्यांनी पुणे आणि मुंबईच्या काही संस्थांना फोनवरुन येथिल जलसंधारण कामांना मदत करण्याची विनंती केली असता या संस्थांनीही तात्काळ दोन ते अडीच कोटी रूपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. अशा पध्दतीने एका तासात कोट्यावधीचा निधी दुष्काळग्रस्त माण आणि खटाव तालुक्याच्या जलसंधारण कामासाठी उभे राहिले.