दोन मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शेतक-याची आत्महत्या
वालचंदनगर : शेतीसाठी पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून इंदापूर अर्बन बँकेचे संचालक आणि शेतकरी वसंत पवार यांनी विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली असून, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारी चिठ्ठी लिहिली आहे.
वसंत पवार वय ४८ यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर व खतांचे दुकान आहे. लासुर्णे व बेलवाडी परिसरामध्ये त्यांची शेती आहे. शनिवारी लासुर्णे येथील दुकानबंद केल्यानंतर घरी गेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींनी त्यांचा रात्रभर शोध घेतला. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदारवस्ती जवळील विहिरीमध्ये तरंगताना आढळला. वालचंदनगर पोलिसांनी मृतदेह पाण्यातुन बाहेर काढल्यानंतर पवार यांच्या खिशात चिठ्ठया आढळल्या असून, या चिठ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळत नसल्याकारणाने पिके जळून गेल्याने कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद केले आहे. नीरा डाव्या कालव्यातून गेल्या वर्षी उन्हाळी हंगामचे पाणी वेळेत न मिळाल्यामुळे आत्महत्येस जबाबदार असणारे राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पवार यांनी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली आहे.