नाणार प्रकल्पाबाबत सेना भाजपाकडून कोकणवासीयांचा विश्वासघात

नाणार प्रकल्पाबाबत सेना भाजपाकडून कोकणवासीयांचा विश्वासघात

धनंजय मुंडे

मुंबई :  कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पाबाबत सेना – भाजपा या दोघांकडूनही कोकणवासीयांचा विश्वासघात आणि फसवणूक करणे सुरू आहे, आज नाणार भूसंपादनाबाबत १८ मे २०१७ ची अधिसूचना रद्द करण्याची उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलेली घोषणाही फार्सच असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

नाणार मध्ये उद्योग मंत्री यांनी आज केलेली घोषणा आणि आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची नाणार मध्ये  झालेली सभा याबाबत मुंडे बोलत होते.  नाणार मधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची कोणतीही कारवाई विभागाने सुरूच केलेली नसतांना ही घोषणा म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर केलेला दिखावा आहे. देसाई यांनी या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का ? कॅबिनेट निर्णय झाला आहे का ? हा प्रकल्प नाणार मध्ये येणार हे माहीत असतांना आज पर्यंत शिवसेना आणि त्यांचे मंत्री गप्प का बसले ?  अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का ?  असे सवाल उपस्थित करतानाच सेना आणि भाजपा हे दोघे मिळून कोकण वासीयांची फसवणूक करत आहेत ,  विश्वासघात करत असल्याचा आरोप त्यांनी केला.  दिल्ली मध्ये कोणाची पत आहे आणि कोणाची नाही हे मला माहित नाही पण भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची जनतेच्या मनातून पत गेली असल्याचा टोला लगावतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोकण वासीयांच्या सोबतच आहे, जनभावना लक्षात घेवूनच प्रकल्पाबाबत निर्णय झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

Previous articleमोदी व्हीलन तर उध्दव ठाकरेंना साइड व्हीलन म्हणावे लागेल
Next articleमुख्यमंत्र्यांनी राज्याची आणि देशाची दिशाभूल करू नये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here