माध्यमांना लोणची, मसाले व पापड पुरवूनच ‘भाजप’ने स्वतःची खिचडी पकवली !

माध्यमांना लोणची, मसाले व पापड पुरवूनच ‘भाजप’ने स्वतःची खिचडी पकवली !

सामनातुन भाजपवर हल्ला

मुंबई : केंद्रियमंत्री संतोष गंगवार यांनी वादग्रस्त विधान करुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आजच्या सामना संपादकियमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला आहे. इतक्या मोठ्या देशात एक-दोन बलात्काराच्या घटना घडणारच असे विधान गंगवार यांनी करून माध्यमांनी त्याचा इतका बाऊ का करावा असा सवाल केला होता. माध्यमांना मसाला देवू नका असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले परंतु २०१४ पर्यंत माध्यमांना लोणची, मसाले व पापड पुरवूनच ‘भाजप’ने स्वतःची खिचडी पकवली. त्यामुळे मसाल्याची बात भाजपने करावी याची गंमत वाटते. राज्यातील भाजपचे पुढारी व मंत्री देखील तोंडास येईल ते बोलत असतात, पण त्यांनी ही प्रेरणा आमच्या पंतप्रधानांपासूनच घेतली असावी अशा शब्दांत टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

काय आहे आजच्या अग्रलेखात….

‘तोंड आवरा’ असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी स्वपक्षाच्याच आमदार-खासदारांना दिला आहे. तोंडास लगाम घालण्याच्या सूचना याआधीही श्री. मोदी यांनी भाजपच्या आमदार-खासदारांना दिल्या होत्या. संसदीय पक्षाच्या बैठकीतही त्यांनी अनेकदा अनेकांची कानउघाडणी केली आहे, पण त्या ‘मोदी’ मंत्राचा उपयोग झाला नाही व अनेक जण तोंडास येईल ते बोलत राहिले. मोदी मंत्रिमंडळातील एक मंत्री संतोष गंगवार यांनी आता ‘बलात्कार’ प्रकरणात जे महनीय विचार मांडले आहेत ते धक्कादायक आहेत. ‘‘इतक्या मोठ्य़ा देशात एक-दोन बलात्काराच्या घटना घडणारच. प्रसिद्धी माध्यमांनी त्याचा इतका बाऊ का करावा?’’ असा भाबडा प्रश्न श्रीमान गंगवार यांनी विचारला आहे. सध्या देशभरात ‘बलात्कार’ व महिलांवरील अत्याचार वाढल्याचे वातावरण आहे. चिमुरड्य़ांवर नराधम अत्याचार करतात व त्यानंतर हत्या करून मृतदेह फेकले जातात, पण इतक्या मोठ्य़ा देशात हे असे घडायचेच असे सांगणारे राज्यकर्ते दिल्लीत विराजमान आहेत. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी राज्याचे त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीही अशीच जीभ घसरली होती. ‘‘इतने बडे शहर में ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है’’ या त्यांच्या विधानावर एकच काहूर माजले व भारतीय जनता पक्षाने तर पाटलांना पळता भुई थोडी केली. शेवटी पाटील यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष गंगवारांचा गुन्हा त्यापेक्षादेखील गंभीर आहे. तरीही ते मंत्रीपदावर चिकटून आहेत व महिलांचा हा असा अपमान केल्याबद्दल त्यांचा राजीनामा कोणी मागितलेला नाही. फक्त ‘तोंड आवरा’ इतकाच महत्त्वाचा सल्ला मिळाला आहे.

Previous articleचंद्रकात पाटील एकदा विधानसभेची निवडणूक लढवून दाखवाच !
Next article२००१ ते २००९ मधील थकित शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here