वन विभागातील रोजंदारीवरील ५६९ मजुरांना नियमित करणार

वन विभागातील रोजंदारीवरील ५६९ मजुरांना नियमित करणार

मुंबई : वन विभागात विविध कामांवर असणाऱ्या आणि ऑक्टोबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या ५६९ रोजंदारी मजुरांना नियमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

वन विभागात वन्यजीव व्यवस्थापन, रोपे निर्मिती, रोपवाटिका, रस्त्यांची कामे, वन संरक्षण आदी कामांवर रोजंदारीने मजूर नेमले जातात. अनेक ठिकाणी नियमित पदे उपलब्ध नसल्याने रोजंदारी स्वरुपाच्या मजुरांकडून कामे पार पाडली जातात. विविध २२ प्रकारच्या कामांसाठी अशा प्रकारच्या मजुरांची आवश्यकता भासते.  वन विभागाच्या या कामांवर प्रदीर्घ सेवा करणाऱ्या आणि ज्यांच्या सेवेची आवश्यकता आहे अशा रोजंदारी मजुरांचा कायम करण्याबाबत विचार करण्यात आला आहे. वन विभागात योजनेंतर्गत अथवा योजनेतर योजनेमध्ये १ नोव्हेंबर १९८९ ते ३१ ऑक्टोबर १९९४ या कालावधीत सलग अथवा खंडित स्वरुपात प्रतिवर्षी किमान २५० दिवस या प्रमाणे किमान पाच वर्षे काम केलेल्या ८ हजार ३९ रोजंदारी मजुरांना जानेवारी १९९६ च्या शासन निर्णयानुसार १ नोव्हेंबर १९९४ पासून शासन सेवेत नियमित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा मार्च १९९८ मध्ये झालेल्या निर्णयानुसार १६१९ व जानेवारी २००० च्या निर्णयानुसार ६०७ मजुरांना शासकीय सेवेत सामावण्यात आले. अशा पद्धतीने एकूण १० हजार २६४ अधिसंख्य वनमजूर पदांवर रोजंदारी मजूर सामावले गेले.

याशिवाय ऑक्टोबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार ६ हजार ५४६ मजूर निकषास पात्र ठरल्याने १ जून २०१२ पासून शासन सेवेत अधिसंख्य वन मजूर पदावर कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याच शासन निर्णयानुसार आणखी काही रोजंदारी मजूर पात्र ठरत असल्याचे आढळून आल्याने याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार या शासन निर्णयातील निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या आणि वन विभागातील योजना अथवा योजनेतर निधीतून वेतन मिळणाऱ्या ५६९ रोजंदारी मजुरांना कायम करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

Previous articleमुख्यमंत्र्यांना उद्योगमंत्र्यांचे आव्हान !
Next articleनिर्वासितांच्या मालमत्ता व जमिनी निर्बंधातून मुक्त करण्याचा निर्णय

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here