नाणारवासियांची फसणवीस सरकारकडून फसवणूक

नाणारवासियांची फसणवीस सरकारकडून फसवणूक

खा. अशोक चव्हाण यांची टिका

मुंबई :  नाणारवासियांना फसणवीस सरकार फसवत असून नाणार रिफायनरी बाबत जे काही चालले आहे ती भाजप शिवसेनेची मॅच फिक्सिंग आहे.  दोन्ही पक्ष जनतेच्या भावनांशी खेळत असून सरकाचे आतून किर्तन बाहेर तमाशा सुरु आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

खा. चव्हाण म्हणाले की, नाणार गावचा औद्योगिक क्षेत्रात समावेश करणारी अधिसूचना रद्द केली असे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणतात तर मुख्यमंत्री म्हणतात अधिसुचना रद्द केली नाही. हायपॉवर कमिटी ही मंत्र्यापेक्षा मोठी नसते मात्र मुख्यमंत्र्यांनी हायपॉवर कमिटी मोठी आहे असे म्हणून आपल्या मंत्र्यांची वाईट अवस्था केली आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला मुख्यमंत्री कवडीचीही किंमत देत नाहीत. जनाची नाही तरी मनाची थोडीशी जरी लाज असेल तर सुभाष देसाई यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि शिवसेनेने सत्तेबाहेर पडले पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

नाणारबाबत सरकारमधील लोकांची परस्पर विरोधी विधाने पाहता सरड्यांनाही लाज वाटेल अशा पध्दतीने सरकार रंग बदलत आहे. काँग्रेस पक्ष नाणार वासियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. नाणारवासियांच्या मर्जीविरोधात हा प्रकल्प या सरकारला रेटून नेता येणार नाही. नाणार आणि परिसराचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज आपला अहवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सादर केला. २८ एप्रिल रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची भेट घेऊन शिष्टमंडळ यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहे या शिष्टमंडळासोबत नाणारवासियही खा. राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. पेट्रोल, डिझेलवर लावलेला अन्यायकारक कर कमी करून इंधनावर लावलेले विविध अधिभार रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली असल्याची माहिती खा. अशोक चव्हाण यांनी या पत्रकारपरिषदेत दिली.

Previous articleपेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कपात करा !
Next articleशिक्षक मतदारसंघासाठी भाजपाच्या उमेदवारांची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here