मी पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

मी पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

नितिन गडकरी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे चित्र बदलले असून, जलसंधारणासह अनेक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले आहे,अशी स्तुती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केली. दिल्लीवरून मी पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभा आहे, असेही गडकरींनी सांगितले.

‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवरील पुस्तकाचे प्रकाशन आज केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या विधिमंडळाच्या इतिहासात नेहमीच पाण्यावरून गदारोळ व्हायचा. मात्र आज मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे खऱ्या अर्थाने टँकरमुक्त महाराष्ट्र साध्य झाला आहे. गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात जलसिंचन व धरण प्रकल्प सुरू झाले. मात्र गैरकारभारामुळे सगळे प्रकल्प अर्धवट पडले होते. या प्रकल्पांच्या रूपाने जवळपास दीड लाख कोटी रुपयांची ही संपत्ती निरुपयोगी पडली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनामुळे आणि कामाच्या झपाट्याने आता हे सर्व प्रकल्प पुन्हा सुरू झाले आहेत. १०८ प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्णत्वाला जातील असे गडकरी यांनी सांगितले. प्रकल्पांसाठी देवेंद्रजींनि पंतप्रधानांची भेट घेतली आणि केंद्रीय निधी मिळवला, असे गडकरी यांनी सांगितले.

दमणगंगा पीर पिंजाळ या नद्यांचे पाणी गुजरातला देण्याचा करार तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांच्याशी केला होता. मात्र फडणवीस यांनी त्यावर सही करण्यास नकार दिला आणि महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रातच राहील अशी तरतूद करवून घेतली, असेही गडकरी यांनी सांगितले. दिली. तापी नर्मदा प्रकल्पही मुख्यमंत्र्यांनी खेचून आणला आहे. महाराष्ट्र बदलत असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, निष्कलंक इमानदार मुख्यमंत्री, स्वच्छ पारदर्शक प्रशासन, निर्णय घेणारे सरकार असणारा आणि सामान्यांचा सामाजिक आर्थिक विकास साधणारा महाराष्ट्र आज आहे. विकासाचे राजकारण करता आले नाही की जातींचे राजकारण करावे लागते. शिवाजी महाराज, डॉ.आंबेडकर म. फुले यांची नावे विरोधक सतत घेतात पण त्यांनी विकासाचा आणि प्रशासनाचा जो मार्ग दाखवला तो कोण चालणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विरोधकांचे राजकारण कधीही स्वतःच्या पत्नी मुलांपालिकडे गेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे माझे चरित्र नाही, तर गेल्या साडे तीन वर्षात सरकारने जी कामे केली आहेत त्या योजनांची यशोगाथा या पुस्तकात आहे. कुपोषणासाठी प्रसिद्ध असलेले मेळघाटातील आडीसल गाव डिजिटल माध्यमातून बदलत आले याचे समाधान आहे, असे फडणवीस म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावे दुष्काळमुक्त झाली आहेत, येत्या तीन वर्षात या योजनेच्या माध्यमातून राज्य पूर्ण दुष्काळमुक्त होईल असेही ते म्हणाले. जलयुक्त शिवार ही आता लोकचळवळ झाली असू ती ऑटो पायलट मोडवर आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मराठवाड्याची जलपातळी तीन मीटरने वाढली आहे. देशात जेवढी विकास कामे सुरू आहेत, त्यातील ५० टक्के महाराष्ट्रात सुरू आहेत. आज देशात महाराष्ट्र पुन्हा प्रथम क्रमांकावर आला आहे, देशातील सर्वात समृद्ध राज्यही महाराष्ट्र होईल, असेही ते म्हणाले.राज्य चालवताना दररोज नव्या समस्यांना सामोरे जावे लागते मात्र सकारात्मकतेने सामोरे गेले तर प्रत्येक प्रश्न सोडवता येतो, असे फडणवीस म्हणाले. कुणाला श्रेय मिळेल याचा विचार न करता लोकांसाठी मी निर्णय घेतो, असे यावेळी फडणवीसांनी सांगितले. स्वतःच्या प्रतिमेत अडकून किंवा कोणाची वाट पाहून निर्णय घेता येत नाहीत, झपाट्याने निर्णय घ्यायचे आणि जनतेसाठी निर्णय घेताना कोणाला बिचकायचे नाही हे मी गडकरी यांच्याकडून शिकलो आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Previous articleशिक्षक मतदारसंघासाठी भाजपाच्या उमेदवारांची घोषणा
Next articleपंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा देशात झळकावले !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here