कर्नाटक निवडणूकीसाठी पंकजा मुंडे स्टार प्रचारक

कर्नाटक निवडणूकीसाठी पंकजा मुंडे स्टार प्रचारक

मुंबई :  पुढील महिन्यात होणा-या कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे हया भाजपच्या स्टार प्रचारक असणार आहेत. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने तशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. निवडणूक प्रचारासाठी त्या उद्या शनिवारी कर्नाटक दौ-यावर जात असून बीदर येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी पुढील महिन्यात १२ मे रोजी मतदान होत आहे. या निवडणूकीसाठी भाजपने देशातील कांही प्रमुख महिला नेत्यांवर प्रचाराची धुरा सोपवली असून त्यात राज्याच्या ग्रामविकासआणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी, खा. पूनम महाजन, साध्वी निरंजना, डी. पुरंदरेश्वरी आदी नेत्यांचा यात समावेश आहे.

पंकजा मुंडे हया भाजपच्या आक्रमक व अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमाणेच आपल्या वक्तृत्वाने त्यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यात व मतदारांना आकर्षित करण्यात त्यांची हातोटी असल्याचे अनेक निवडणूकांमध्ये दिसून आले आहे. त्यांच्यातील नेतृत्वाचे गुण ओळखून पक्षाने त्यांना कर्नाटकाच्या मैदानात उतरविले आहे. उद्या शनिवारी त्या बीदर येथे प्रचारासाठी जाणार असून याठिकाणी  हाॅटेल शिवा इंटरनॅशनल येथे आयोजित केलेल्या महिला संवाद सभेस त्या संबोधित करणार आहेत. भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येदियुरप्पा यांच्यासह कर्नाटक भाजपचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

 

Previous articleमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुहास पेडणेकर
Next articleमाधव भांडारी यांना मंत्रीपदाचा दर्जा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here