विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपाची आघाडी
राष्ट्रवादीची काँग्रेसवर कुरघोडी
मुंबई : स्वबळावर लढण्याची घोषणा करणा-या शिवसेनेने राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपापुढे युतीचा हात पुढे केला आहे,शिवसेनेने सहा पैकी तीन जागा भारतीय जनता पार्टीसाठी जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता धुसर असून एक अतिरिक्त उमेदवार देत राष्ट्रवादीने काँग्रेसवर कुरघोडी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या गुरूवार शेवटचा दिवस आहे. विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे तीन, भाजपाचे दोन तर काँग्रेसचा एक सदस्य निवृत्त होत आहे. राष्ट्रवादीने नाशिकमधून शिवाजी सहाणे आणि रायगडमधून सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय त्यांनी बीड-उस्मानाबाद-लातूरमधून भाजपामधून राष्ट्रवादीत दाखल झालेले रमेश कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा काँग्रेसची होती. तेथून काँग्रेसचे दिलीप देशमुख निवृत्त होत आहेत. त्यामुळे या जागेवर उमेदवार देवून राष्ट्रवादीने काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. परभणीतून राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्रानी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
भाजपाने प्रवीण पोटे-पाटील (अमरावती) ,रामदास आंबटकर (वर्धा-चंद्रपूर) यांची उमेदवारी जाहीर करतानाच राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले सुरेश धस यांना बीड-लातूर-उस्मानाबाद मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेने त्यांचा एकही उमेदवार निवृत्त होत नसताना तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. नाशिकमधून नरेंद्र दराडे, परभणी-हिंगोलीतून विपुल बाजोरिया आणि रायगड-रत्नागिरीमधून राजीव साबळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आता या निवडणुकीत कोण कोणाला साथ देते यावर विधान परिषदेच्या निवडणुकीचा कल अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.











