मंत्री राम शिंदेंनी जामखेडचं बिहार केलंय
मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा- नवाब मलिक यांची मागणी
मुंबई : जामखेडमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांच्या आर्शिवादाने गुंडगिरी सुरु असून, जामखेडचं बिहार केल्याचा आरोप करतानाच राम शिंदे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करुन दोषींवर आरोपपत्र दाखल करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन तरुण कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. देशी कट्टा वापरुन ही हत्या करण्यात आली. जामखेडमध्ये डॉ.शेख यांच्यावरही असाच हल्ला झाला होता. राम शिंदे हे अहमदनगरचे पालकमंत्री आहेत. या नगरमध्ये कायम अधिकारी कामावर नाहीत. अधिकारी काम करायला तयार नाही. इथे कायद्याचे राज्य नसून, मंत्र्यांच्या मनाचा कारभार सुरु असल्याचा आरोप मलिक यांनी यावेळी केला.गुंडांचा वापर करुन राजकारण करण्याचे काम मंत्री करत आहेत. राम शिंदेंच्या आर्शिवादाने ही गुंडगिरी सुरु असून राम शिंदे यांच्या माने तालमीमध्ये हे गुंड पोसले जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या भागात लक्ष घालून राम शिंदे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी व आरोपींवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी मलिक यांनी केली.










