विधानपरिषदेसाठी अखेर कॅांग्रेस राष्ट्रवादीत आघाडी
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या विधानपरिषद निवडणूकीत अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याचे निश्चित केले आणि त्या नुसार आज जागावाटप करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ज्या उस्मानाबाद-बीड-लातूरच्या जागेवरुन आघाडी अडली होती, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडली आहे. त्या बदल्यात परभणीची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे.उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात भाजपमधून राष्ट्रवादी प्रवेश केलेले रमेश कराड हे आघाडीचे उमेदवार असतील. नव्या समीकरणानुसार कोकण, नाशिक आणि लातूर या तीन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत, तर अमरावती, चंद्रपूर आणि परभणी या जागांवर काँग्रेस उमेदवार देईल.
विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी येत्या २१ मे ला मतदान होणार आहे. उस्मानाबाद-बीड-लातूर, रमेश कराड (राष्ट्रवादी); रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी); नाशिक – शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी); तर कॉंग्रेसकडून वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मधून इंद्रकुमार बालमुकुंद सराफ, अमरावतीमधून अनिल माधोगडिया, तर परभणी,हिंगोली मधून सुरेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३ मे अंतिम तारीख आहे. २१ मे रोजी मतदान होईल, तर २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.










