काँग्रेसच्या दिग्विजयाची सुरुवात पालघरच्या पोटनिवडणुकीतून होणार

काँग्रेसच्या दिग्विजयाची सुरुवात पालघरच्या पोटनिवडणुकीतून होणार

खा. अशोक चव्हाण

पालघर :  २०१९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित असून पालघरची जनता या पोटनिवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब करेल असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची नियोजनबध्द व्यूहरचना तयार करण्याकरिता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण स्वतः पालघरमध्ये दाखल झाले व त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पालघरच्या वाघोटे गावात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, देशपातळीवर भाजप आणि मोदींविरोधात जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत असंतोष आहे. देशात झालेल्या जवळपास प्रत्येक निवडणुकीत जनतेने भाजपला पराभवाची धूळ चारली आहे. जनता भाजप, शिवसेना या सत्ताधा-यांच्या विरोधात त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणुकीची संधी शोधते आहे असे वातावरण आहे. पालघरमध्ये आदिवासींवर होणारे अत्याचार, बळजबरीने त्यांच्या जमिनी बळकावणे, कुषोषणाचे बळी, प्रचंड प्रमाणात सुरु असेलला भ्रष्टाचार, समृध्दी महामार्गासाठी बळजबरीने सुरु असलेले भूसंपादन यामुळे जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेमध्ये चाललेली उमेदवारांची पळवापळवी यातून या पक्षांना कोणतीही नैतिकता राहिली नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे पालघरवासीय या मस्तवाल झालेल्या सत्ताधा-यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते निकराने आणि त्वेषाने ही लढाई लढतील असा निर्धार काँग्रेस प्रदेशाद्यक्षांनी व्यक्त केला. त्याला या बैठकीला उपस्थित असलेल्या तमाम कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सहित समविचारी पक्षाची समन्वय समिती स्थापन करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्षांनी दिले. व त्याचबरोबर महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयुआय इत्यादी आघाडी संघटनांची तसेच सोशल मिडीया व विविध विभागांच्या पदाधिका-यांशी प्रदेशाध्यक्षांनी संवाद साधून या संघटनांनी तयार केलेल्या व्यूहरचनेचा आढावा घेतला.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधीत करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून एकदिलाने राष्ट्रवादी काँग्रेस या लढाईत सहभागी होईल असा निर्वाळा दिला. दोन्ही पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केला.यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी खासदार दामू शिंगडा, आ. भाई जगताप, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केदार काळे, वसई शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉमिणीक डिमेलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रमाकांत म्हात्रे, सचिव मनिष गणोरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निलमताई राऊत, दोन्ही पक्षांचे तालुकाध्यक्ष,  प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleनारायण राणेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा
Next articleमुख्यमंत्री आणि अमिताभ बच्चन यांच्या उपस्थित साजरा होणार राजधानी महोत्सव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here