परदेशी शिष्टमंडळात मुख्य सचिवांना भेटला ‘बालपणीचा वर्गमित्र’!…

परदेशी शिष्टमंडळात मुख्य सचिवांना भेटला ‘बालपणीचा वर्गमित्र’!….

मुंबई : दोन देशांमधील सौहार्दपूर्ण संबंध अधिक बळकट व्हावे यासाठी विवीध प्रकारची शिष्टमंडळे महाराष्ट्राच्या भेटीवर येत असतात. त्यातच अशाच एका शिष्टमंडळात आपला बालपणीचा वर्गमित्र असणे आणि त्याची अनेक वर्षानंतर अचानक भेट होणे ही सुखद आश्चर्याचा धक्का देणारी घटना राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या बाबतीत काल घडली…एखाद्या चित्रपटातील प्रसंग शोभावा अशा या घटनेचे साक्षीदार ठरले बांगलादेशी माध्यम प्रतिनिधिंचे शिष्टमंडळ आणि राज्य प्रशासनातील काही मोजकेच अधिकारी…

बांगलादेश मधील माध्यम प्रतिनिधिंचे शिष्टमंडळ भारताच्या भेटीवर आले आहे. काल ते दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून त्याच्या नियोजित भेटीत मुख्य सचिवांच्या भेटीचा पहिलाच कार्यक्रम होता. बरोबर सायंकाळी सहाच्या सुमाराला शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झाले..मुख्य सचिवांच्या समिती कक्षात स्वागत आणि ओळख परिचयाचा औपचारिक कार्यक्रम झाला. त्यांनतर मुख्य सचिवांनी शिष्टमंडळाचे स्वागत करीत मुंबई देशाची आर्थिक राजधानी, विकसित महाराष्ट्र, बॉलिवूड आदी संदर्भात विवेचन केले.

शिष्टमंडळातील सदस्यांनीही मुंबईशी निगडित आठवणी, बांग्लादेशवासीयांमध्ये मुंबई, बॉलीवूड विषयी असलेलं आकर्षण याविषयी अनुभव कथन केले. दोन्ही देशांमधील वाणिज्यिक संबंध, औद्योगिक गुंतवणूक यावर चर्चा झाली.  अशा प्रकारच्या बैठकित राजशिष्टाचाराला धरून औपचारिक वातावरणात चर्चा होत असते. तशीच चर्चा सुरु असतानाशिष्टमंडळातील अल्तमास कबीर हे सदस्य आपल्या जागेवरून उठले आणि मुख्य सचिवांकडे गेले आणि ‘मित्रा आपण एका शाळेतच नव्हे तर एकाच वर्गात होतो’ याची आठवण करून दिली. उंच, काळ सावळा रंग  आणि अनुभवाच्या खुणा दर्शविणारे पांढरे केस, धीरगंभीर चेहरा असलेले श्री. कबीर  यांना पाहताच  मुख्य सचिवांनाही तो सुखद धक्का होता आणि उपस्थितांनाही. कबीर हे सध्या बांग्लादेशातील दै.संगबाद चे संपादक म्हणून काम पाहतात.

त्याच क्षणी सन १९७१ ते १९७६ चा काळ मुख्य सचिवांच्या डोळ्यासमोर तरळला… अजमेर राजस्थान येथील ‘मेयो’ माध्यमिक विद्यालयात मुख्य सचिव  जैन व  कबीर हे इयत्ता सहावी  ते अकरावी पर्यंत एकाच वर्गात शिकले. एवढ्या वर्षांनी झालेल्या भेटीनंतर दोघांनी काल आठवणींना उजाळा दिला. वर्गात सोबत कोण होते त्यातील काहींची नावे घेतली आणि मुख्य सचिवांना तो काळ पुन्हा आठवला..आश्चर्य मिश्रित आनंदाचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. कबीर यांनी आपल्या बालपणीच्या वर्गमित्राला बांगलादेशला नक्की यायचे असे निमंत्रण दिले.  या घटनेनंतर क्षणात बैठकीचा औपचारीकपणाचा माहोल बदलला..

सौहार्दपूर्ण संबंध दृढ करण्यासाठी आलेल्या परदेशातील शिष्टमंडळात आपला बालमित्र भेटणे याहून सुखद बाब ती कोणती.माणूस कितीही सर्वोच्च पदावर असला तरी आपल्या जुन्या वर्गमित्राची अचानक भेट झाली तर सगळा शिष्टाचार बाजूला ठेवून तो आपल्या आठवणीत हरवून जातो..तसेच काहीसे मुख्य सचिवांचे झाले होते.मुंबई भेटीच्या गोड स्मृती सोबत नेतानाच अनेक वर्षांनंतर आपला बालमित्र भेटल्याची आठवण बांगलादेशच्या कबीर यांना सर्वांत जास्त भावणार यात शंका नाही.

Previous articleछगन भुजबळांना अजून उपचाराची अथवा शस्त्रक्रियेची गरज !
Next articleशिवसेनेचा आणि आमचा २५ वर्षांपासून घरोबा- भुजबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here