पलूस कडेगावमधून विश्वजीत कदम बिनविरोध
सांगली: माजी मंत्री पंतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी येत्या २८ मे रोजी मतदान घेण्यात येणार होते मात्र आज भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कॅांग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कॅांग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार येत्या २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार होती. रिक्त झालेल्या जागी काँगेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह सहा अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या ठिकाणी शिवसेनेने उमेदवार उभा न करता विश्वजीत कदम यांना पाठिंबा देत ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन इतर पक्षांना केले होते.आता ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपने आज या पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले आहे.