शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली
मुंबई : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची येत्या ८ जून रोजी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. मे महिन्याची सुट्टी असल्याने या निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार भारत निर्वाचन आयोगाने या निवडणूका पुढे ढकलल्या असून, मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर या निवडणूका होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे.
मुंबई ,कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निर्वाचन आयोगाने शनिवारी जाहीर केला होता. त्यानुसार या चार विधानपरिषदेच्या जागांसाठी येत्या ८ जून रोजी मतदान घेण्यात येणार होते. मात्र सध्या मे महिन्याची सुट्टी असल्याने ही निवडणूक ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार भारत निर्वाचन आयोगाने शनिवारी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द केला आहे. तसे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना कळविले आहे. या निर्णयामुळे मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त मुंबई बाहेर गेलेल्या व मतदानापासून वंचित राहणार्या सर्व शिक्षक , पदवीधर मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई विभाग पदवीधर मतदार संघातून शिवसेनेचे डाॅ.दिपक सावंत, मुंबई विभाग शिक्षक मतदार संघातून जनता दल युनायटेडचे कपिल पाटील, कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे, तर नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अपक्ष डाॅ. अपूर्व प्रशांत हिरे यांची मुदत येत्या ७ जुलै रोजी संपत आहे.