मुंबईतील खार जमिनी गिळंकृत करू देणार नाही
पर्यावरणमंत्र्यांचा इशारा
मुंबई : मुंबईतील मिठागरांच्या जमिनीवर होणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेला राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कडाडून विरोध केला. मुंबईचे पर्यावरण धोक्यात आणणारे आणि केवळ बिल्डरांच्या नफ्यासाठी आखलेले हे धोरण म्हणजे केवळ धूळफेक असून, गरिबांची ढाल करून त्यांना बनवण्याचा प्रकार आहे. मुंबईच्या पर्यावरणात या मुळे बिघाड होईल आणि मुंबईला अधिक त्रास होईल त्यामुळे खार जमिनी सरकारी धोरणाच्या नावाखाली गिळंकृत करू देणार नाही, असा इशारा त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
या पूर्वीही महाराष्ट्रात कमाल जमीन नागरी कायदा रद्द करून शासनाने अशीच धूळफेक केली होती तेव्हा एकट्या शिवसेनेने त्यास विरोध केला होता आणि हा कायदा रद्द करणे हि केवळ बिल्डर धार्जिणे धोरण आहे असे म्हटले होते, मुंबईत तेव्हा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा हि काढला गेला, मात्र त्या वेळेस शिवसेनेला एकटे पडले गेले होते, तेव्हाही काही लाख घरे गरिबांना मिळतील अशी आवई उठवली होती, ती घरे कुठे गेली असा प्रश्न आता कोणी विचारत नाही. शासनात बसलेले काही अधिकारी अशीच बिल्डर धार्जिणी धोरणे आखतात आणि राज्याच्या जनतेला भूलथापा देऊन बनवतात. मुंबईच्या पर्यावरणाला नख लावण्याचा प्रकार शिवसेना कदापि सहन करणार नाही आणि यशस्वीही होऊ देणार नाही असा मुद्दाही पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या प्रसंगी मांडला असे सूत्रांनी सांगितले.