बारामती माढा मध्ये नविन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार

बारामती माढा मध्ये नविन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार

मुंबई :  राज्यात अमरावती ,अकोला, चंद्रपूर, बारामती आणि माढा येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली.

देशात दर ५० कि.मी. अंतरावर पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे उद्दिष्ट असून, या दिशेने महत्वाचे पाऊल टाकत पासपोर्ट तुमच्या दारी या कार्यक्रमाच्या तिस-या टप्प्याची आज घोषणा केली आहे. या टप्प्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील अमरावती, अकोला आणि  चंद्रपूर या जिल्हयांच्या ठिकाणांसह पुणे जिल्यातील बारामती आणि सोलापूर जिल्हयातील माढा या तालुक्यांच्या ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशातील  १४ राज्यांमध्ये ३८ नवीन  पासपोर्ट सेवा केंद्र  उभारण्यास आज मंजुरी देण्यात आल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

देशातील नागरिकांना त्यांच्या जिल्हयातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने “पासपोर्ट आपल्या दारी” या कार्यक्रमांतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम  हाती घेतला.  या कार्यक्रमाच्या पहिल्या दोन टप्प्यांतर्गत आतापर्यंत देशभरात  १९२ तर  महाराष्ट्र परिक्षेत्रात १३  नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले. या कार्यक्रमांतर्गत पहिल्या दोन टप्प्यात महाराष्ट्रात आतापर्यंत वर्धा, जालना, औरंगाबाद,अहमदनगर,बीड,नांदेड, सांगली, कोल्हापूर,सातारा,घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड तसेच महाराष्ट्र परिक्षेत्रातील सिल्वासा व दमन-दिव याठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आली आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या दोन टप्प्यात महाराष्ट्र परिक्षेत्रात २० पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार असून यातील १३ सेवा केंद्र सुरु झाली असून उर्वरीत ७ पासपोर्ट सेवा केंद्र लवकरच उघडण्यात येतील. तसेच तिस-या टप्प्यात नव्याने समावेश करण्यात आलेली ५ पासपोर्ट सेवा केंद्रही सुरु होणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

Previous articleअन्यथा भाजपा स्वबळावर निवडणूक लढविणार
Next articleमुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेतर्फे शिवाजी शेंडगेंना उमेदवारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here