कर्नाटकात हुकुमशाहीवर लोकशाहीचा विजयः खा. अशोक चव्हाण

कर्नाटकात हुकुमशाहीवर लोकशाहीचा विजयः खा. अशोक चव्हाण

मुंबई :  काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या निष्ठावान आमदारांनी भाजपच्या धनशक्तीचा आणि झुंडशाहीचा पराभव करत हुकुमशाहीवर विजय मिळवला आहे. लोकशाहीचा हा विजय ऐतिहासिक आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

कर्नाटकच्या राज्यपालांनी संविधानाला पायदळी तुळवत मुख्यमंत्रीपदी नियुक्त केलेल्या बी. एस. येदीयुरप्पा यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता रडत राजीनामा देत पळ काढला. यानंतर गांधी भवन या प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून, फटाके फोडून, आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकार आणि विविध राज्यातील भाजप व संघाची पार्श्वभूमी असलेल्या राज्यपालांकडून वारंवार अधिकाराचा गैरवापर करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. कर्नाटकच्या राज्यपालांनीही संविधान आणि नैतिकतेची कुठलीही तमा न बाळगता केंद्र सरकारच्या दबावाखाली बहुमत नसतानाही येदीयुरप्पा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आणि बहुमत सिध्द करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देत घोडेबाजाराला प्रोत्साहन दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या मनमानीला चाप लावत आजच बहुमत सिध्द करण्यास सांगतिले. यामुळे बहुमत नसलेल्या येदीयुरप्पांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता रडत रडत राजीनामा दिला व भाजप आमदारांसह राष्ट्रगीत सुरु असताना सदनाबाहेर पळ काढत राष्ट्रगीताचा अवमान केला. यापूर्वी कर्नाटकच्या राज्यपालांनीही अशाच प्रकारे राष्ट्रगीताचा अवमान केला होता. राष्ट्रगीताचा अवमान केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने देशाची माफी मागावी अशी मागणी खा. अशोक चव्हाण यांनी केली.

भाजपकडे बहुमत नसतानाही घोडेबाजार आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा प्रयत्न केला.  केंद्र सरकारने त्यांच्या अखत्यारितील सर्व संस्थांचा गैरवापर करून त्यांना मदत केली. काँग्रेस व जनता दल सेक्युलरच्या आमदारांना पैशाची व पदाची आमिषे दाखवली,  धमकावले,अपहरण करण्याचा प्रयत्नही केला. मात्र भाजपच्या प्रलोभनाला बळी न पडता, धमक्यांना न घाबरता दोन्ही पक्षांच्या निष्ठावान आमदारांनी लोकशाहीचे रक्षण केले. त्यांची निष्ठा ही भाजपच्या धनशक्तीच्या राजकारणाला लगावलेली सणसणीत चपराक आहे. कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरचे बहुमताचे सरकार येणार असून ही काँग्रेसच्या विजयाची नांदी आहे. आगामी काळात होणा-या विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

Previous articleकर्नाटकातील घटनेमुळे देशातील राजकीय चित्र पालटणार!
Next articleबीड जि.प. च्या ‘त्या’ सहा सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती ; मतदानात भाग घेणार !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here