विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी उद्या मतदान;बीडमध्ये भाजपची कसोटी !
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी उद्या सोमवारी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली ,अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्थां मतदार संघात निवडणूक होत असली तरी उस्मानाबाद-लातूर-बीड या मतदार संघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अशोक जगदाळे यांच्यात ही लढत होत असून, या ठिकाणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राष्ट्रवादीचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) जयंत जाधव ( नाशिक ), बाबा जानी दुर्राणी ( परभणी-हिंगोली),काॅग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड), भाजपाचे प्रवीण पोटे ( अमरावती ) आणि मितेश भांगडिया ( वर्धा चंद्रपूर गडचिरोली ) या सदस्यांची ( अनिल तटकरे ३१मे ) २१ जून रोजी मुदत संपत आहे. या रिक्त झालेल्या सहा जागांसाठी उद्या सोमवारी २१ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होत आहे. गुरूवार २४ मे रोजी मतमोजणी होईल.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड मधून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात लढत होत आहे.या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नाशिक मध्येही शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशीच लढत होत आहे.या ठिकाणी शिवसेनेचे नरेंद्र दराडे तर राष्ट्रवादीने शिवाजी सहाणे यांच्यात सामना होत आहे.वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघमधून काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ आणि भाजपचे रामदास अंबटकर हे आमने सामने आहेत.परभणी हिंगोली मधून काॅग्रेस आणि शिवसेनेत लढत होत आहे. शिवसेनेचे विपलव बजोरीया आणि काॅग्रेसचे सुरेश देशमुख यांच्यात लढत होत आहे.अमरावती मध्ये भाजपचे प्रविण पोटे आणि काॅग्रेसचे अनिल मधोगरीया यांच्यात सरळ लढत होत आहे. लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघातील लढत चुरशीची होत असून,भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.या ठिकाणी राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीला जोरदार झटका बसला.त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला.या मतदार संघात एकूण १ हजार ५ मतदार असून, मतदारांच्या पात्र अपात्रेच्या पार्श्वभूमीवर निवडणूकीत रंगत आली आहे.या ठिकाणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
गेल्या विधानसभा निवडणूकीनंतर झालेल्या स्थानिक निवडणूकीत भाजपने मोठी मुसंडी मारली आहे.या सहा मतदार संघात मतदारांची संख्या पाहिल्यास भाजप दोन जागांवर बाजी मारण्याची दाट शक्यता आहे तर तीन जागा लढविणा-या शिवसेनेची कसोटी लागणार आहे. या निवडणूकीत ज्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे भाजपने उमेदवार दिलेला नाही. शिवसेनेने स्वबळाची घोषणा केली असली तरी जागा वाटपावरून शिवसेना भाजपात समजोता झाल्याचे चित्र आहे.सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड मध्ये राजकीय पक्षीय बलाबलामध्ये शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष असला तरी सुनिल तटकरे यांनी मुलाच्या विजयासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि शेकापशी हातमिळवणी केल्याने ये मतदारसंघात शिवसेनेची कसोटी लागणार आहे. अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर या मतदारसंघातील संख्याबळाचा विचार करता या ठिकाणी भाजप सुरक्षित आहे तर परभणी-हिंगोलीत काँग्रेसची बाजू भक्कम आहे.