पालघरचा वचपा काढण्यासाठी कोकणात भाजप राष्ट्रवादीला मदत करणार ?
रायगड : कोकणातील विधानपरिषदेसाठी होवु घातलेल्या निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर आले असतानाच राज्यातील सेना-भाजप युतीमधील दुरावा वाढत असल्याचे दिसुन येत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजपची हक्काची जागा असताना शिवसेनेने थेट श्रीनिवास वनगा यांनाच शिवसेनेत प्रवेश देत उमेदवारी दिल्याने भाजपला एक प्रकारे मोठे आव्हान दिले आहे.तर त्या बदल्यात भाजपने कोकणातील राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे निवडणूक रिंगणात आहेत तर शिवसेनेने राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे. कोकणातील सेना-भाजपचे संख्याबळ पाहता शिवसेनेच्या उमेदवाराचा सुकर समजला जात होता.मात्र सेना-भाजपमधील कलगीतुरा पाहता ते आजच्या घडीला शक्य दिसत नाही. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराविरोधात जागा लढविल्याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार तटकरेंना मदत करण्याचे भाजपने ठरविले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
आमदार सुनील तटकरे यांचा दांडगा राजकीय अनुभव आणि सर्व पक्षीयांसोबत असलेले संबंध पाहता आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा.नारायण राणेंकडे असलेली ९७, शेतकरी कामगार पक्षाची एकगठ्ठा असलेली तीन आकडी मते देखील मिळवण्यात तटकरे यांना यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कॉग्रेस पक्षासोबत आघाडी झाल्याने तसेच मनसे-रिपाई सोबत केलेल्या महाआघाडीमुळे त्यांची मते सुद्धा अनिकेत तटकरे यांच्या पारड्यात पडणार आहेत. केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची मानली जात आहे असे असतांना सेनेच्या उमेदवाराला निवडुन आणणे मंत्री गीतेंना “अवघड” जाणार असल्याची चर्चा आहे. कोकण मतदारसंघातील भाजपकडे असलेली तब्बल १५० मते कोणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.