बीड नगरपालिकेच्या ‘त्या’ अकरा अपात्र नगरसेवकांना मतदान करता येणार
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आज होणा-या मतदानाच्या दिवशी बीड नगरपालिकेच्या ‘त्या’ अकरा अपात्र नगरसेवकांना मतदान तर करता येईल पण मतमोजणीच्या दिवशी गरज पडली तरच त्यांच्या मतांचा विचार केला जाणार आहे, तसा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज दिला. ऐन निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला या निर्णयाने चांगलाच दणका बसला आहे.
आठ महिन्यांपुर्वी बीडमध्ये नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या केबीनमध्ये काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी घाण टाकली होती, या प्रकरणात दहा नगरसेवकांना मागच्या दोन दिवसांपुर्वी नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी अपात्र केले होते, या निर्णयाच्या विरोधात काल आघाडीच्या नगरसेवकांनी हायकोर्टात धाव घेवून याचिका दाखल केली होती. यावेळी नगराध्यक्षांच्या गटानेही आपली याचिका दाखल करून त्या दहा नगरसेवकांना मतदानापासून रोखावे असे म्हणणे मांडल्याचे समोर येत आहे. त्यावर सदर नगरसेवकांना आजच्या निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार दिला, मात्र गरज पडली तरच त्यांच्या मतांचा विचार करावा, असा निर्णय दिल्याचे संबंधितांच्या वकिलांनी सांगितले. याचप्रमाणे शिरूरचे नगर पंचायतीचे अपात्र नगरसेवक भिमराव गायकवाड हेही उच्च न्यायालयात गेले होते, त्यानुसार त्यांना मतदान करता येईल पण ते ग्राह्य धरले जाणार नाही, जर दोन्ही उमेदवारांना सारखे मते पडले तर कोर्ट अंतीम सुनावणी करून निर्णय देणार आहे. याशिवाय २५ मे रोजी शिरूर पंचायत समितीमध्ये होणार्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पुर्वी नगरविकास खात्याने गायकवाड यांच्या अपात्रेवर सुनावणी घेण्याचेही कोर्टाने म्हटले आहे. याठिकाणी जिल्हाधिकार्यांच्या आदेशास स्थगिती मिळाली तरच भिमराव गायकवाड यांना २५ मे रोजी मतदान करता येणार आहे. दरम्यान, ऐन निवडणूकीत हातात आलेल्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच धास्तावले आहेत.










