गेल्या चार वर्षात राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी भाजपचा मार्ग पत्करला
मुंबई : गेल्या चार वर्षामध्ये राष्ट्रवादीच्या डझनभर नेत्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला आहे.त्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी पक्षाची साथ सोडून भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. नंदुरबार मधिल वजनदार नेते आणि माजी मंत्री विजय कुमार गावित यांनी भाजपात प्रवेश करीत विधानसभा निवडणूक लढवली ते मोठ्या मतांनी विजयी झाले त्यानंतर त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांची कन्या हिना गावीत यांनी भाजपकडून निवडणूक लढवून लोकसभेत जाण्याचा मार्ग पत्करला. भिवंडीतील राष्ट्रवादीचे नेते कपिल पाटील यांनी गेल्या लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भिवंडी मधून लोकसभा निवडणूक लढविली. सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद सदस्य संजय काका पाटील यांनी लोकसभा निवडणूकीत भाजपात प्रवेश करून निवडणूक लढवली. आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद भूषविलेले संजय सावकारे यांनी राष्ट्रवादीला धक्का देत भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. बीडचे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री सुरेश धस, विनायक मेटे, मुरबाडचे नेते किसन कथोरे, मंदा म्हात्रे , भारती लव्हेकर, आणि आजच ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देत भाजपचा मार्ग पत्करला आहे.










