बीड उस्मानाबाद लातूरची मतमोजणी पुढे ढकलली

बीड उस्मानाबाद लातूरची मतमोजणी पुढे ढकलली

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी उद्या मतमोजणी

मुंबई :   स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी २१ मे रोजी झालेल्या मतदानाची उद्या गुरूवारी मतमोजणी होत असून, उस्मानाबाद-लातूर-बीड या मतदारसंघातील मतमोजणी केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे.या ठिकाणी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली, या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी प्रतिनिधी निवडला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग), जयवंत जाधव (नाशिक), बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली),काँग्रेसचे दिलीप देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड), भारतीय जनता पार्टीचे प्रवीण पोटे (अमरावती) आणि मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) या सदस्यांची मुदत संपत असल्यामुळे येथे २१ मे रोजी मतदान पार पडले  आहे.

सिंधुदूर्ग-रत्नागिरी-रायगडमधून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात लढत होत आहे. याठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नाशिकमध्येही शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत आहे. याठिकाणी शिवसेनेचे नरेंद्र दराडे तर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्यात सामना होत आहे. या मतदारसंघात भाजपाने राष्ट्रवादीला जाहीर तसेच अघोषित पाठिंबा जाहीर केला आहे. परभणी-हिंगोलीमधून शिवसेनेचे विपुल बाजोरिया आणि काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्यात लढत होत आहे.या मतदारसंघातही भाजपाने शिवसेनेला साथ दिलेली नाही. त्यामुळे या तीन उमेदवारांपैकी शिवसेनेचे किती उमेदवार निवडून येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अमरावतीमध्ये राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल मधोगरिया यांच्यात सरळ लढत होत आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघमधून काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ आणि भाजपाचे रामदास अंबटकर आमने सामने आहेत. लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघातील लढत चुरशीची झाली आहे. येथे राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. या ठिकाणीची होणारी मतमोजणी केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Previous articleगेल्या चार वर्षात राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी भाजपचा मार्ग पत्करला
Next articleफक्त निवडणुकीपुरते भूंकू नका-उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला