पाठीत वार करणाऱ्यांना धडा शिकवा : योगी आदित्यनाथ
विरार : पाठीत वार करणा-यांना धडा शिकवा असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे झालेल्या जाहीर सभेत केले.काही जण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत अफझलखानाचे काम करीत आहेत असा घणाघात ही त्यानी केला.भारताला जागतिक महाशक्ती म्हणून पहायचे असेल तर भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांना विजयी करा, असे आवाहन आज उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व केले.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आज योगी आदित्यनाथ विरार येथे आले होते. ही निवडणूक २०१९ चा सराव ठरू दे असेही आवाहन त्यांनी जनतेला केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महाशक्ती बनत आहे. ही प्रगती ना पहावणाऱ्या शक्ती भाजपच्या मार्गात अडथळे आणू पाहत आहेत. चिंतामण वनगा यांच्या पुत्राला फोडून जे घडवले गेले, तो याच प्रकारचे कारस्थान आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या या कारवाया पाहून आज बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला सर्वात जास्त यातना होत असतील, असेही योगी ते म्हणाले. या परिसरातील काही जणांची गुंडागर्दी मोडून काढण्याची हीच वेळ आहे. उत्तर प्रदेश सुधारतो तर पालघर का सुधारणार नाही, असा सवालही त्यांनी केला. काही जण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत अफझलखानाचे काम करीत आहेत, असा घणाघात योगी यांनी केला.










