भाजपात प्रवेश करण्यासाठी अजून खूप लोक रांगेत : मुख्यमंत्री
मुंबई : राष्ट्रवादीचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. समाजातील विविध क्षेत्रांतील चांगल्या लोकांना भाजपात काम करण्याची संधी मिळते. एक चांगला कार्यकर्ता म्हणून निरंजन डावखरेंना भाजपामध्ये प्रवेश दिला असून, भाजपात प्रवेश करण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
आमदारकीचा राजीनामा दिलेले निरंजन डावखरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि आ. प्रसाद लाड, भाजपा ठाणे विभाग अध्यक्ष खा. कपिल पाटील, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये व अतुल शाह तसेच आ. अतुल सावे व जगदीश मुळीक उपस्थित होते. यावेळी अकोल्याचे नगरसेवक गोपी महादेवराव ठाकरे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
निरंजन डावखरे हे पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त करून, अजून खूप लोक रांगेत आहेत त्याबाबत आताच काही बोलणार नाही, परंतु योग्य वेळ येताच ते सर्वांना समजेल त्यामुळे निरंजन डावखरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारीसाठी निरंजन डावखरे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली असून ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला तर निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे कोकणात भाजपाला बळकटी मिळेल, असे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले. निरंजन डावखरे यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांमुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपामध्ये प्रवेश करण्याची त्यांची इच्छा होती. भाजपा एकामागोमाग निवडणुका जिंकत आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातही निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीने भाजपाचा विजय निश्चित असून, त्यामुळे कोकणात भाजप अधिक बळकट होईल असे दानवे म्हणाले.










