“साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला पाहिजे”: ओडिओ क्लिपमुळे खळबळ
पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी दोन दिवस बाकी असतानाच काल पालघरमध्ये झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कथित ऑडिओ क्लिप सादर करून भाजपला मोठा धक्का दिला आहे. पालघरमध्ये भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अधिच अडचणीत सापडलेल्या भाजपपुढील अडचणी वाढू शकतात.तर ही क्लीप अर्धवट आणि एडिट केलेली दाखवली जात असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे ?
एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे……….
आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केले पाहिजे.ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही.आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे.ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा. साम, दाम, दंड, भेद.ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीने आणि खंबीरपणे मी उभा आहे. ‘अरे ला कारे’च करायचे. ‘अरे ला कारे’ मध्येच उत्तर द्यायचे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
भाजपची प्रतिक्रिया…
पराभव समोर दिसू लागल्यामुळे सैरभैर झालेल्या शिवसेनेकडून अशा प्रकारची अर्धवट आणि एडिट केलेली आॅडीओ क्लीप दाखवली जात आहे. तंत्रज्ञानाचा निषेधार्ह गैरवापर असून या संदर्भात आज निवडणूक आयोगाकडे भाजपा तक्रार करणार आहेच पण त्या बरोबर खरी क्लीप आज भाजपा जाहीर करेल. असे भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगितले.
काॅग्रेसची प्रतिक्रिया….
या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ खुलासा करावा. निवडणुक आयोगाने याप्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी. क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा. क्लिप खोटी असेल तर उध्दव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.











