मोदींच्या नेतृत्त्वाखाली चार वर्षात देश प्रगतीच्या महामार्गावर
ना. पंकजा मुंडे यांचा पुण्यात पत्रकारांशी वार्तालाप
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. सामान्य माणसापर्यंत विकास कसा पोहचेल, याची खबरदारी घेतली आहे. त्यांनी आणलेल्या विविध योजनांमुळे आणि राबविलेल्या प्रकल्पांमुळे सध्या देश प्रगतीच्या महामार्गावर आहे. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय स्थरावरही देशाची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. गेली ७० वर्षात समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला असता, तर आज देशाचे चित्र वेगळे असते, असा टोला कॉंग्रेसला मारत ७० वर्षात जे झाले नाही, ते पाच वर्षांत व्हावे, अशी मागणी करणे अवाजवी असल्याचेही मत मुंडे यांनी व्यक्त केले.
केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येऊन चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ना. पंकजाताई मुंडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामाची माहिती दिली. याप्रसंगी पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार भिमराव तापकीर, आ. माधुरी मिसाळ, आ. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी उपस्थित होते.
ना. पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या, गेल्या चार वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात महिला, युवक, सामान्य नागरिक, कामगार, शेतकरी, व्यावसायिक, अशा सर्व घटकांसाठी विविध योजना सूक्ष्म नियोजन करुन राबविण्यात आल्या आहेत. महामार्ग, रेल्वेचे जाळे देशात विणले जात आहे. काही योजनांचे यश दिसून येण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी अपूर्ण आहे. एखाद्या कुटूंबप्रमुखाप्रमाणे विद्यमान पंतप्रधानांचा संपुर्ण देशभरात वावर आहे. देश महासत्तेकडे जाताना एक चांगला राज्यकर्ता मोदींच्या रुपाने देशाला मिळाला आहे, असेही त्या म्हणाल्या.
स्वच्छता अभियानामुळे देशातील सतरापेक्षा अधिक राज्ये आणि ३ लाख ६० हजार गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. जनधन योजनेतून ३१.५२ कोटी खाती उघडली गेली असून ५५ टक्के नागरिक नव्याने बँकींग क्षेत्राशी जोडले गेले आहेत. पंतप्रधान विमा योजनेतून १३ कोटी २५ लाख लोकांनी लाभ घेतला आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेतून ५ कोटी २२ लाख लोकांना लाभ दिला आहे. प्रधानमंत्री वय बंधन योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर ८ टक्के व्याजदर आणि २०२२ पर्यंत १५ लाख रुपयांच्या गुंतवणूकीला परवानगी दिली आहे. थेट बँक खात्यात लाभ जमा योजनेतून २० कोटी १४ लाभाथ्र्यांपर्यंत ६९ हजार ८१५ कोटी रुपयांचा लाभ दिला आहे, असेही मुंडे म्हणाल्या.
आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल
स्वच्छता अभियान, प्रधानमंत्री विमा व जीवन ज्योती विमा योजना, जनधन योजना, वयबंधन योजना, ५० टक्के नुकसान झाल्यानंतर देण्यात येणारी नुकसानभरपाई ३३ टक्के नुकसान झाल्यानंतर आता दिली जात आहे. कृषी कर्जाचे उद्दिष्ट ११ लाख कोटी रुपयांपर्यंत मर्यादा वाढवली आहे, आयुषमान भारत आरोग्य योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महू या जन्मगावी संग्रहालय उभारण्यात येत असून लंडन येथील घरही सरकारने विकत घेतले आहे. दिव्यांग नागरिक, शिक्षण, स्वयंरोजगार, खेलो इंडिया आणि मुद्रा अशा विविध योजनांमधून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला असून तेवढेच लाभार्थी आहेत, असे सांगत पंकजाताई यांनी जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारची वाटचाल सुरू आहे, असा दावा यावेळी त्यांनी केला.
महिलांसाठी विशेष योजना राबवल्या
प्रसुती रजा तीनवरुन सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली असून उज्ज्वला योजनेतून गॅस जोडण्या दिल्या आहेत. ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ योजनेतून देशातील १०४ जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर वाढला आहे. बारा वर्षांखालील मुलींवर अत्याचार झाल्यास फाशी, तर सोळा वर्षांखालील मुलींवर अत्याचार करणा-यांवर दहा वरुन वीस वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली आहे. तिहेरी तलाक बंद केला असून हजला जाताना पुरूष बरोबर असण्याची अट शिथील करण्यात आली आहे, असे ना.पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.