मतदान यंत्रात मध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्या

मतदान यंत्रात मध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्या
खा. अशोक चव्हाण यांची मागणी
मुंबई :  पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी आज दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली. भंडारा-गोंदिया मतदारसंघात तर जवळपास २५ टक्के मतदान यंत्रात आणि व्हीव्ही पॅट यंत्रामध्ये बिघाड झाल्याने तासन् तास रांगेत उभे राहूनही मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ज्या मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाला त्या सर्व मतदान केंद्रावर फेरमतदान घ्यावे आणि मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅट स्लीपचीही मोजणी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मात्र आज दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. भाजप कार्यकर्ते खुले आम मतदारांना पैसे वाटत होते, काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले. भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार निवडणूक आचारसंहितेचा भंग केला. याबाबत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या तरी निवडणूक आयोगाने काहीही कारवाई केली नाही. मतदानापूर्वी मतदारांना पोल चीट देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे मात्र अनेक ठिकाणी मतदारांना पोल चीट वाटल्या गेल्या नाहीत.
जवळपास २५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानयंत्रामध्ये बिघाड होणे संशयास्पद आहे. उन्हामुळे व तापमानामुळे मतदानयंत्रे खराब होतात हे निवडणूक आयोगाने दिलेले स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही. देशात यापूर्वी ही अनेकदा उन्हाळ्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दोन आठवड्यापूर्वीच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकाही कडक उन्हाळ्यात मे महिन्यामध्येच पार पडल्या होत्या तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानयंत्रामध्ये बिघाड झाले नव्हते. आज देशभरात विविध ठिकाणी होणा-या पोटनिवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान यंत्र  खराब झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या मशीन गुजरातमधून आणल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे संशयात अधिक भर पडत आहे.  उन्हामुळे मशीन खराब होते तर आयोगाने मतदान यंत्रा ऐवजी बॅलेटपेपरवर मतदान का घेतले नाही? असा संतप्त सवाल करून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
Previous articleमोदींच्या नेतृत्त्वाखाली चार वर्षात देश प्रगतीच्या महामार्गावर
Next articleमशीनचा गैरवापर करून सरकारचा निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न