पालघर पोटनिवडणूकीत ४६.५० टक्के मतदान
मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी अंदाजे ४६.५० टक्के मतदान झाले असून, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, भाजपचे राजेंद्र गावीत, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव व काँग्रेसचे दामोदर शिंगडा यांच्यासह ७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त झाले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ४६.५० टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मतदानादरम्यान मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड वगळता जिल्हयामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
पालघर या मतदार संघात १७ लाख ३१ हजार ७७ मतदार आहेत. यापैकी ९ लाख ७ हजार ४०० पुरुष तर ८ लाख २३ हजार ५९२ स्त्री, इतर ८५ मतदार आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी पहिल्यांदाच व्हिव्हिपॅट मशिनचा वापर करण्यात आला. आज मतदानास सुरूवात झाल्यानंतर काही ठिकाणी मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर संबंधित ठिकाणी तात्काळ नवीन मशिन उपलब्ध करुन देण्यात आल्या. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु करण्यात आली होती. १५ टक्के मशिन राखीव असल्याने तांत्रिक समस्या निर्माण झालेल्या ठिकाणी तात्काळ मशिन अथवा तंत्रज्ञानाच्या मदतीने सदर समस्येचे निराकरण करण्यात आल्याची ही माहिती डॉ. नारनवरे यांनी दिली.
पालघर जिल्हयामध्ये दिवसभरात अंदाजे २७६ वहिव्हिपॅट मशिन तांत्रिक कारणास्तव बदलावे लागले . पालघर जिल्हयात एकूण २ हजार ९७ मतदान केंद्र हेाते तर जिल्हयासाठी २ हजार ६०८ व्हिवहिपॅट मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तर २४८० CU BU उपलब्ध करुन देण्यात आले होते. अशी माहिती डॉ. नारनवरे यांनी दिली.
येत्या गुरूवारी ३१ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी गोडाऊन क्र.२, सुर्याकॉलनी येथे होणार आहे.