सेना भाजप युती टिकावी : नितीन गडकरी
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना आणि भाजपातील संबंध टोकाला गेलेले असतानाच या दोन्ही पक्षांची युती टिकावी अशी अपेक्षा केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.शिवसेना आणि भाजपाचे नाते म्हणजे ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असे गडकरी मिश्किलपणे म्हणाले.
शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजप नेते सेनेसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत तर पालघर पोटनिवडणूकीत शिवसेनेने उमेदवार उतरून थेट भाजपला आव्हान दिल्याने या दोन्ही पक्षातील असणारे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यापुढे युती संदर्भात केवळ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीच चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर आज केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेशी नमते घेण्याचे संकेत दिले आहेत.केंद्रातील मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना आणि भाजपची असलेली युती टिकली पाहिजे, असे सांगतानाच शिवसेना आणि भाजपा मधिल नातं ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’, असे असल्याचे त्यांनी म्हटले.