भंडारा गोंदियातील ४९ मतदान केंद्रांवर फेरमतदान
मुंबई : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेल्या पोटनिवडणुकीत काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ४९ मतदान केंद्रांवर उद्या बुधवारी फेरमतदान घेण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने मंगळवारी याची घोषणा केली. सकाळी सात ते संध्याकाळी सहा, या वेळेत हे फेरमतदान होईल. नक्षलग्रस्त भागात हे फेरमतदान दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहे. भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव, तिरोरा आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे १४, चार, दोन, आठ आणि २१ मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे.गुरूवारी भंडारा-गोंदिया तसेच पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सोमवारी या दोन्ही ठिकाणी मतदान झाले होते.भंडारामध्ये ४२.५० टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.