विद्युत निरीक्षणालयात आता मुख्य विद्युत निरीक्षकाचे पद
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्युत निरीक्षणालय ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली आणल्यानंतर याचे नियंत्रण करण्यासाठी मुख्य विद्युत निरीक्षक पद मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली.
विद्युत निरीक्षणालय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना त्याचे सर्व प्रशासकीय कामकाज मुख्य अभियंता (विद्युत) यांच्याकडून हाताळण्यात येत होते. मात्र विद्युत अधिनियम २००३ व त्या अनुषंगाने बनविण्यात आलेले नियम व विनियम सक्षमपणे राबविण्यासाठी २०१५ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्युत निरीक्षणालय ऊर्जा विभागाच्या अस्थापनेखाली आणल्यानंतर या निरीक्षणालयासाठी मुख्य विद्युत निरीक्षक पद निर्माण करणे आवश्यक बनले होते.
मुख्य विद्युत निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली विद्युत निरीक्षणालय शाखेतील अधिक्षक अभियंता, विद्युत निरीक्षक, सहाय्यक विद्युत निरीक्षक, सहाय्यक अभियंता श्रेणी-२, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता ही तांत्रिक व उपसंचालक (लेखा), विद्युत निरीक्षक व इतर अतांत्रिक अशी एकूण १ हजार ४६ पदे कार्यरत आहे. या अस्थापनेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच महसूल वसुलीचे काम आणखी प्रभावी करण्यासाठी मुख्य विद्युत निरीक्षक हे पद निर्माण करण्यात आले असून या पदासाठी ३७ हजार ४००,-६७ हजार ही वेतनश्रेणी असून १० हजार हा ग्रेड पे आहे.